Loksabha 2019: 17 मतदारसंघांच्या निकालाचा अंदाज; चौथ्या टप्प्यात कोण मारणार बाजी?

बुधवार, 1 मे 2019

29 एप्रिलला महाराष्ट्रातल्या 17 लोकसभा मतदारसंघात मतदानाचा चौथा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा पूर्ण झाला. या टप्प्यांत कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 17 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न.

शिरूरमध्ये कोल्हे इतिहास घडवणार
शिरुर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी तगडे आव्हान निर्माण केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आढळराव हे 301,814 अशा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे यावेळी लिड कमी होईल पण आढळरावच निवडून येतील अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खात्री वाटते. तर कोल्हे यांच्या लोकप्रियतेचा फायदा होईल आणि यंदा शिवसेनेला धक्का बसेल असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आढळरावांच्या स्वत:च्या आंबेगांव तालुक्यात यावेळी सर्वात जास्त मतदान झाले आहे. इथे दिलीप वळसे यांची भूमिका निर्णायकी ठरेल. तसेच शहरी भागात वाढलेला मतदानाचा टक्का महत्वाचा वाटतो. त्यामुळे पारडे कोल्हे यांच्या बाजूने झुकलेले वाटते.

पार्थवरील विश्वास मावळमध्ये सार्थ ठरणार
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यात थेट लढत झाली. सुरवातीच्या काळात श्रीरंग बारणे हे आघाडीवर होते, परंतु 23 एप्रिलला राज्यात तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांनी मावळ मतदारसंघात प्रचार करून पार्थ यांना बळ दिले. सोबतच, चिंचवड आणि उरण विधानसभा मतदारसंघात झालेले अधिकचे मतदान राष्ट्रवादीला बळ देईल असे बोलेले जात आहे. पार्थ यांना पवार कुटुंबावरील राग-रोषाचा परिणाम निकालात जाणवणार हे नक्की.

शिर्डीत वाकचौरेंची बंडखोरी कोणाच्या पथ्यावर?
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन मातब्बर नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली होती. खासदार सदाशिव लोखंडे (शिवसेना) आणि आमदार भाऊसाहेब कांबळे (कॉंग्रेस) यांच्यातच सामना रंगलाय. लोखंडेंना विखेंचे तर कांबळेंना थोरातांचे पाठबळ मिळाले. शेवटच्या टप्प्यात झालेली राहुल गांधी यांची सभा, थोरातांना मिळालेले बळ यामुळे कांबळे यांचं नाव पुढे आलंय. पण माजी खासदार आणि भाजपचे नेते भाऊसाहेब वाकचौरे यांनी मतदारसंघात तिसरे आव्हान निर्माण केलंय. वाकचौरेंची बंडखोरी कोणाला फायदेशीर ठरणार, की दोघांच्या मतविभाजनात तेच बाजी मारणार याची उत्सुकता लागून आहे.

ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार
नरेंद्र मोदींच्या लाटेत शिवसेनेचे राजन विचारे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दोन लाख 90 हजार मतांनी ठाण्यातून निवडून आले होते. यंदा प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात लढत जिंकल्याच्या अविर्भावात युतीचे कार्यकर्ते होते; मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी प्रत्यक्ष प्रचारासह समाज माध्यमांचा पुरेपूर वापर केल्याने लढतीचा प्रवास एकतर्फीपासून 'कॉंटे की टक्कर' पर्यंत पोहोचला. पण अजूनही शिवसेना गड राखणार असे दिसतेय.
 
'कल्याण' श्रीकांत शिंदेंचेच होणार
कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. पाटील यांच्या रूपात राष्ट्रवादीने आगरी कार्ड पुढे केले आहे. शिवसेनेतही आगरी समाजातील नेत्यांची फळी मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने हे कार्ड किती यशस्वी होईल, याबाबत साशंकता आहे. कल्याण मतदारसंघ हा युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून विशेष कोणी नेता या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नव्हता. हीच युतीसाठी जमेची बाजू ठरेल.

भिवंडीत पाटील की टावरे?
भिवंडीतील यंत्रमागधारकांचे प्रश्‍न सोडविण्यात भाजपला अपयश आले असून जीएसटी, नोटाबंदी, वीज आणि पाणी या प्रश्‍नांवरून येथील नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीचा सूराचा फटका कपिल पाटील यांना बसेल, असे वाटते. भाजपच्या मुस्लिमविरोधी भूमिकेचाही त्यांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्‍यता आहे. मतदारसंघात 15 उमेदवार रिंगणात असले, तरीही कपिल पाटील आणि कॉंग्रेस आघाडीचे सुरेश टावरे यांच्यात मुख्य लढत झाली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कपिल पाटील यांच्यासाठी भाजप आणि शिवसेनेची बूथ यंत्रणा सक्रिय केली, ही पाटील यांची जमेची बाजू. भिवंडी मतदारसंघात शिवसेनेचे दोन, तर भाजपचे तीन आमदार आहेत याचाही लाभ पाटील यांना होण्याची शक्यता आहे. पण भिवंडी महापालिकेत भाजपचे 19, तर शिवसेनेचे 12 नगरसेवक आहेत. त्या तुलनेत कॉंग्रेसकडे 47 नगरसेवक आहेत. यामुळे फायदा सुरेश टावरेंना अधिक होऊ शकतो.

पालघरमध्ये गावितांची खासदारकी कायम राहणार
पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीपुढे (बविआ) नवे चिन्ह - रिक्षा हे मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी घाम गाळावा लागला. "बविआ'ची वाट अशी अवघड दिसत असल्यामुळे राजेंद्र गावितांची खासदारकी कायम राहणार अशीच चिन्हे सध्या पालघरमध्ये दिसत आहेत. हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. या वेळी मतदारसंघ शिवसेनेला दिल्याने भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. सोबत गावितही भाजपमधून आयात केलेले उमेदवार असल्याने  एक अनिश्चितता दिसते पण एकूण सातकमळाचा प्रभाव चालणार असे दिसते.

नाशिकमध्ये चौरंगी लढतीने सामना अवघड!
राष्ट्रवादी कॉंग्रेसने समीर भुजबळ यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले तर शिवसेनेने खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली होती. सरळ वाटणारा सामना वंचित बहुजन आघाडीने पवन पवार आणि भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चौरंगी झाला. यात पवार हे भुजबळांच्या मतावर तर कोकाटे हे गोडसेंच्या मतांवर डल्ला मारणार असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच नाशिकमध्ये निकाल सांगणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.

दिंडोरीत अटीतटीचा सामना
दिंडोरी मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या धनराज महालेंना राष्ट्रवादीकडून तर राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवारांना भाजपने उमेदवारी दिली होती. उमेदवारांच्या अदल-बदलाने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ दिसला. अशाही स्थितीत आपापल्या शक्तिस्थळांच्या जोरावर चुरस वाढवण्यासाठी धडपडणाऱ्या या दोन उमेदवारांसमोर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आमदार जीवा पांडू गावितांच्या उमेदवारीने कडवे आव्हान उभे केले. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अटीतटीचा सामना झालेला पाहायला मिळाला. सोबत, खासदारकीची हॅट्ट्रिक करणारे हरिश्‍चंद्र चव्हाण यांची उमेदवारी भाजपने कापल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार असल्याचे बोलले जात आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला विधानसभा मतदारसंघात 66.12 टक्के मतदान झाले असल्याने याचा फायदा निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसला होईल असे दिसते.

काँग्रेसला धुळ्यात संजीवनी
संरक्षण राज्यमंत्रीच निवडणुकी रिंगणात असल्याने "हायप्रोफाइल' ठरलेल्या लोकसभेच्या धुळे मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. यात कॉंग्रेस आघाडीने "एकी'तून सत्ताधारी महायुतीला नमविण्यासाठी बळ वाढवले आहे. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांची प्रतिष्ठा या लढाईत पणाला लागली आहे. भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांची  बंडखोरी कुणाल पाटील यांच्या पथ्यावर पडणार असे दिसते. त्यामुळे यावेळी काँग्रेसला धुळ्यातून संजीवनी मिळ्यण्याची शक्यता आहे.

नंदुरबारमध्ये के. सी पाडवी बाजी मारणार?
नंदुरबार मतदारसंघातील लढत कॉंग्रेसचे ऍड. के. सी. पाडवी आणि भाजपच्या डॉ. हिना गावित यांच्यात असली तरी तिला अंतर्गत अनेक पदर आणि नाराजीची झालर आहे. त्यातच भाजपचे निष्ठावंत, संघ परिवाराचे विश्‍वासू डॉ. सुहास नटावदकर यांनी अपक्ष म्हणून उडी घेतल्याने भाजपला फटका बसणार आहे. हीना गावित यांनी नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी मांडत कॉंग्रेससमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण कॉंग्रेसने एकमताने उमेदवारी निश्‍चित करीत ऍड. के. सी. पाडवी यांचे काम केल्याने काँग्रेसचे पारडे जड आहे.

सोमय्यांना नाकारल्याने संजय पाटलांचा दावा मजबूत
उत्तर-पूर्व मुंबईत भाजपने शिवसेनेसोबतची युती टिकविण्यासाठी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली. भाजपमधील हे मतभेत राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. संजय पाटील यांना यापूर्वीही या मतदारसंघातून खासदारकीचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा सोमय्यांना नाकारल्याने संजय पाटील यांचा दावा मजबूत आहे. 

गायकवाड की शेवाळे कोण मारणार बाजी?
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असून, सेनेचे राहुल शेवाळे यांचा सामना काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याविरुद्ध होत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. यंदा मात्र, दोघांत जोरदार चुरस असून, गायकवाड यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करत प्रचार केला आहे. तरीही सत्ताधारी शिवसेनेला या मतदारसंघातील विजयाची खात्री आहे.

प्रिया दत्तचे पूनम महाजनांपुढे कडवे आव्हान
प्रमोद महाजन यांचा वारसा असलेल्या पूनम महाजन आणि सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांच्यात उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात चुरस आहे. भाजपच्या राष्ट्रीय युवा मोर्चाची अध्यक्ष असलेल्या पूनम यांच्यापुढे दोनवेळा खासदार राहिलेल्या प्रिया दत्त यांचे कडवे आव्हान आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांचाच पराभव करून पूनम महाजन खासदार झाल्या होत्या. यंदा प्रिया दत्त यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. पण, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्या लढण्यास तयार झाल्या. प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी संजय दत्त यांनीही रोड शो घेतला होता. प्रिया दत्त यांचा जनसंपर्क आणि सेनेच्या नाराजीचा फटका महाजन याना बसेल असे दिसते. 

उत्तर मुंबईत उर्मिलाचीच हवा
मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचीच हवा होती. उर्मिलासमोर भाजपचे अनुभवी खासदार गोपाळ शेट्टी असले तरी उर्मिलाने प्रचारात घेतलले आघाडी लक्षणीय आहे. गोपाळ शेट्टींविरोधात काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती. काँग्रेसने या मतदारसंघातून उर्मिलाला तिकीट देत निवडणूकित मराठी मुलगी आणली. शेट्टींचा जनसंपर्क दांडगा असला तरी याच मतदारसंघातून गोविंदाने अनुभवी राम नाईक यांचा पराभव केला होता, हा इतिहास आहे.

दक्षिण मुंबईतील मतदार युतीला तारणार
उच्चभ्रू व मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 52.15 टक्के मतदान झाले. कॉंग्रेसचे पारंपरिक मतदार असलेल्या मुंबादेवी, कुलाबा परिसरात या वेळी कमी मतदान झाले. ही बाब कॉंग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात जाण्याची शक्‍यता आहे. या भागातील मुस्लिम मते यापूर्वी निर्णायक ठरत होती; मात्र मतदारसंघ फेररचनेत शिवडी विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबईत आल्यापासून येथील गणिते बदलली. या वेळी तुलनेने मलबार हिल, भायखळा आणि शिवडी या भागांत अधिक मतदान झाले. भायखळा परिसरातील मतदारांचा प्रतिसाद युती व आघाडीसाठी संमिश्र असल्यामुळे मलबार हिल येथील उच्चभ्रू, गुजराती, राजस्थानी मतदान निर्णायक ठरणार आहे. चिराबाजार, गिरगाव, खेतवाडी, ग्रॅंट रोड, मुंबई सेंट्रल, लालबाग, शिवडी या भागांतील मतदानाचा टक्का 'जैसे थे' राहिला. त्यामुळे युतीत आनंदाचे वातावरण आहे.

वायव्य मुंबईत सेनेच्या कीर्तिकरांनाच पसंती
उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनाच पुन्हा मतदारांची पसंती मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे आव्हान होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर यांनी काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. कामत यांचे नुकतेच निधन झाल्याने काँग्रेस कीर्तिकरांविरुद्ध कोणाला उतविणार याबाबत विविध नावांची चर्चा होती. पण, आपल्या आंदोलनामुळे पक्षश्रेष्ठींकडे विश्वास निर्माण करणाऱ्या संजय निरुपम यांना संधी देण्यात आली.