Loksabha 2019 : भाजपच्या रणजितसिंहांचा अर्ज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

कोणताही गाजावाजा न करता, पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी काल माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

सोलापूर - कोणताही गाजावाजा न करता, पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांनी एकूण तीन अर्ज दाखल केले आहेत. 

दरम्यान, रणजितसिंहांसह आठ उमेदवारांनी 11 अर्ज दाखल केले आहेत. आजअखेर दाखल अर्जांची संख्या 12 झाली आहे. यामध्ये भाजपसह बहुजन महापार्टी, हिंदुस्थान प्रजा पक्ष अशा तीन राजकीय पक्षांसह पाच अपक्षांचा समावेश आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसअखेर 80 उमेदवारांनी 140 अर्ज नेले आहेत. 

अतिरिक्‍त जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे अर्ज दाखल करताना रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासमवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार नारायण पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवसेनेचे समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत देशमुख, दादा साठे प्रमुख उपस्थित होते. 

निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी त्यांना पूरक म्हणून सहकारमंत्री देशमुख यांच्यासाठी सचिन जाधव यांनी एक अर्ज नेला आहे, तर हिंदुस्थान जनता पक्षाकडून इरफान अली इनायतअली  पटेल यांनी एक अर्ज नेला आहे. याबरोबरच दहा अपक्षांनी अर्ज नेले आहेत. सहकारमंत्री देशमुख हे नाईक-निंबाळकर यांच्यासाठी पूरक म्हणून अर्ज भरणार आहेत. 
नाईक-निंबाळकर यांच्याशिवाय बहुजन महापार्टीकडून शहाजहान पैगंबर शेख, हिंदुस्थान प्रजा पक्षाचे नवनाथ भीमराव पाटील यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. अपक्षांमध्ये संदीप खरात, अजिनाथ केवटे, सिद्धेश्‍वर आवारे, बापूराव रूपनवर यांनी प्रत्येकी एक, तर रामदास माने यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. 

माढ्याच्या मैदानात मीही 
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे शेवटच्या क्षणी माढ्यातून अर्ज भरणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर सहकारमंत्री देशमुख यांनी शरद पवार माढा लढविणार असतील तर मीही त्या रणांगणात उतरणार असल्याचे सांगितले. आता सध्या केवळ नाईक-निंबाळकर यांच्या अर्जासाठी पूरक म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी घेतला असल्याचे देशमुख म्हणाले. 

मित्रपक्षांच्या पाठबळावर विजय निश्‍चित 
भाजप कार्यकर्त्यांबरोबरच शिवसेना, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना, आरपीआय या मित्रपक्षांच्या व जनतेच्या पाठबळावर आपला विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला. 

Web Title: Ranjeet Singh Naik-Nimbalkar application for BJP filed