संभाजी ब्रिगेडचे राज्यभरात सात उमेदवार रिंगणात

राजेभाऊ मोगल
बुधवार, 3 एप्रिल 2019

- लोकसभेसाठी सात मतदारसंघांत संभाजी ब्रिगेडने दिले उमेदवार
- जेथे उमेदवार नाही, तेथे धर्मनिरपेक्ष विचारांच्या उमेदवारांना सहकार्य
- झुंडशाही, हिटलरशाही, आरएसएसमुक्‍त भारत हेच आमचे स्लोगन

औरंगाबाद: लोकसभेसाठी राज्यातील 48 पैकी माढा, नवी मुंबई, भिवंडी, जालना, उस्मानाबाद, रावेर, पुणे, सोलापूर या सात मतदारसंघांत संभाजी ब्रिगेडने उमेदवार दिले आहेत. जेथे उमेदवार देणार नाहीत, त्याठिकाणी आघाडी व महायुतीच्या व्यतिरिक्‍त धर्मनिरपेक्ष विचारांच्या अन्य उमेदवारांना सहकार्य करणार आहोत. झुंडशाही, हिटलरशाही, आरएसएसमुक्‍त भारत हेच आमचे स्लोगन असेल, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड. मनोज आखरे यांनी येथे घोषित केले. 

लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी (ता. 02) आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. आखरे म्हणाले, की शेतमालास भाव अन्‌ दारूमुक्‍त गाव ही आमची भूमिका आहे. या देशात सध्या धर्मनिरपेक्ष राजकारणाची गरज असून, त्या अनुषंगाने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या आमच्यासाठी आलटून पालटून राजकारण करणाऱ्या चार शाह्या आहेत. त्यांच्याकडून शेतकरी, महिला, रोजगार, विद्यार्थ्यांचे कुठलेही प्रश्‍न सुटू शकलेले नाहीत. त्यामुळे या चारही पक्षांविरोधात आमचा संघर्ष आहे. पत्रकार परिषदेस संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, महानगराध्यक्ष बाबासाहेब दाभाडे, रवींद्र वहाटुळे, रेखा वहाटुळे, राम भगुरे, राहुल भोसले आदी उपस्थित होते. 

हे असतील उमेदवार 
नवी मुंबई-विठ्ठल नाथा चव्हाण, भिवंडी-संजय काशीनाथ पाटील, जालना-श्‍याम रुस्तुमराव शिरसाट, माढा-विश्वंभर नारायण काशीद, रावेर-रवींद्र पवार, उस्मानाबाद-इंजि. नेताजी गोरे, पुणे-विकास पासलकर किंवा संतोष शिंदे, सोलापूर-श्रीकांत मस्के, शिरूर-शिवाजी उत्तम पवार यांना उमेदवारी घोषित केली आहे.

Web Title: Sambhaji Brigade to Contest on seven loksabha seats in maharashtra