पुन्हा 'युती बंधन'; भाजप-शिवसेनेच्या स्वबळाच्या तलवारी म्यान 

पुन्हा 'युती बंधन'; भाजप-शिवसेनेच्या स्वबळाच्या तलवारी म्यान 

मुंबई : "देशात हिंदूविरोधी गट एकवटत असून हिंदूहिताच्या पक्षांचा पराभव करण्याचे त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षांची युती करत आहोत. याच राष्ट्रहिताच्या आग्रहामुळे भाजपसोबत युतीचा निर्णय घेतला,'' अशी कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिली. 

"ब्ल्यू सी' हॉटेलमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. आगामी लोकसभा व विधानसभेत दोन्ही पक्ष युतीनेच लढणार असल्याचे जाहीर केले. 
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ""गेली 25 वर्षे युतीत दोन्ही पक्ष वावरलेत. काही मुद्द्यांवर मतभेद झाले असतील; पण दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी आहेत. मूळ विचार सारखा राहिल्यानेच आम्ही 25 वर्षे सोबत राहिलो. विधानसभेत सोबत राहू शकलो नाही; पण केंद्रात व राज्यात सरकारमध्ये एकत्र होतो. यापुढेही एकत्रच राहणार.'' 

"देशात काही लोक एकत्र येऊन राष्ट्रीय विचारांना आव्हान देताहेत, त्यासाठी राष्ट्रीय विचारांच्या पक्षांनी एकत्र यावे ही जनभावना होती. ती आज पूर्ण झाल्याचे समाधान आहे,'' असे मुख्यमंत्री म्हणाले. 

"अयोध्येत राममंदिर व्हावे ही आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. भाजपचे त्याला संपूर्ण समर्थन आहे. केंद्र सरकारने त्यासाठीचा मार्ग सुकर केला आहे. राममंदिरासोबतच शेतकरीहिताचे निर्णय झाले पाहिजेत, हा आग्रह उद्धव यांचा आहे. कर्जमाफी दिली आहे; पण काही शेतकरी तांत्रिक कारणांनी वंचित राहिले, ते त्यांनी लक्षात आणून दिले. ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही, त्यांचा आढावा घेणार व कर्जमाफी देणार,'' असे मुख्यमंत्री म्हणाले. 

"नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही; पण स्थानिकांचा जमिनी देण्यास विरोध आहे, त्यामुळे शिवसेना स्थानिकांसोबत असल्याने तेथील प्रकल्प रद्द करून अन्यत्र हलविण्यात येईल,'' अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. 

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांचे बलिदान वाया जाणार नाही. आपला देश लेचापेचा नाही हे पाकिस्तानला दाखवून द्यावे. राममंदिर हा प्रमुख मुद्दा आहे. अविवादित जागा न्यासाला दिली आहे, त्यावर लवकरच मंदिर उभे राहील अशी आशा आहे.'' नाणार येथील प्रकल्प रद्द करण्याची ग्वाही दिल्याबद्दल ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. 

विचार एक असेल तर काही गैरसमजांवर भांडत बसून पुन्हा चोरांच्या हातात सत्ता द्यायची का? असा सवाल करत, काही चुका झाल्या असतील; पण ते कटू अनुभव पुन्हा येऊ नयेत याची दक्षता घ्या, असेही ठाकरे म्हणाले. 

"दोन्ही पक्षांच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांची मने आनंदित झाली आहेत असे अमित शहा यांनी या वेळी स्पष्ट केले. "भाजपचे सर्वांत जुने सहकारी शिवसेना व अकाली दल आहेत. मध्यंतरीच्या काळात जे मतभेद झाले ते आता सर्व निवळले आहेत. ही राजकीय युती नाही तर सिद्धांतावर आधारित युती आहे.'' 

"देवेद्र फडणवीस सरकारने भ्रष्टाचाराला उखडून टाकण्याचे काम केले आहे. भाजप- शिवसेनेचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून एकत्र लढतील,'' असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. 

असे असेल सूत्र 

लोकसभेसाठी 
शिवसेना 23 
भाजप 25 

विधानसभेसाठी 
मित्रपक्षांना जागा देऊन उर्वरित जागा "फिफ्टी फिफ्टी' 

मुख्यमंत्री म्हणाले... 
- दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्त्वाचा दुवा 
- जनहितासाठी युतीचा निर्णय 
- शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आग्रही 
- कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळणार 
- शेतकरीहिताच्या निर्णयांना प्राधान्य देणार 
- पीकविम्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार 
- कोकणातील नाणार प्रकल्पाची जागा बदलणार, स्थानिकांना विश्वासात घेणार 
- मुंबईतील 500 चौरस फूटजागेवरील घरांना कर नाही 

उद्धव ठाकरे म्हणाले... 
- काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी का एकत्र येऊ नये? 
- दोन्ही पक्षांमध्ये काही गैरसमज झाले. मात्र आता आम्ही नव्याने सुरवात करत आहोत 
- हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपची युती 
- रामराज्य आहे, तर राम मंदिर हवेच 
- दोन्ही पक्षांचे धोरण एक आहे. त्यामुळे आता मतभेद नको; अन्यथा इतरांचं फावेल. 
- निवडणुका येत जात असतात. मात्र युतीचं नाते 30 वर्षे जुने 
- कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला. मात्र, यंत्रणेतील त्रुटींमुळे अनेक जण लाभापासून वंचित 
- पंतप्रधान पीक विमा योजना चांगली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडून हप्ता घेण्यात आला. 

अमित शहा म्हणाले... 
- युती व्हावी, अशी कोट्यवधी कार्यकर्त्यांची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. 
- शिवसेना हा भाजपचा सर्वांत जुना मित्र 
- दुरावा आज या क्षणापासून विसरा आणि एकजुटीने कामाला लागा 
- ही युती केवळ राजकीय नाही तर वैचारिक पार्श्वभूमीवर आधारलेली 
- राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चांगले काम केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com