Loksabha 2019 : भीतीने मोदींच्या विरोधकांना धमक्‍या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

सध्या संपूर्ण तपास यंत्रणा ताब्यात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी ऊठसूठ कोणालाही धमक्‍या देतात. तुरुंगात डांबण्याची विरोधकांना भीती दाखवतात. मात्र, कोणी कायमस्वरूपी सत्तेवर राहात नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे.

नागपूर - सध्या संपूर्ण तपास यंत्रणा ताब्यात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी ऊठसूठ कोणालाही धमक्‍या देतात. तुरुंगात डांबण्याची विरोधकांना भीती दाखवतात. मात्र, कोणी कायमस्वरूपी सत्तेवर राहात नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. गुजरातमध्ये घडलेले गोधराकांड कोणी घडविले, कोणाच्या कार्यकाळात घडले आणि तेव्हा मुख्यमंत्री कोण होते हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मोदी यांनाच इशारा दिला.

नागपूर आणि गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघांतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भुजबळ नागपूरला आले होते. हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बुधवारी गोंदिया येथील जाहीर सभेत मोदी यांनी तिहार जेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची वाट बघत असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. यावर उत्तर देताना भुजबळ यांनी गुजरातमधील गोधराकांडात जे उद्‌ध्वस्त झाले तेच एक दिवस पेटून उठतील आणि मोदी यांच्या विरोधात जातील, असे सांगितले. बारामतीत जाऊन शरद पवार आपले गुरू आहेत, त्यांचेच बोट पकडून राजकारणात प्रवेश केला, असे मोदी यांनी स्वतःच जाहीर सभेत सांगितले होते. आता त्यांना गुरूची अचानक भीती वाटायला लागली आहे. म्हणूनच त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात आरोप करीत आहेत, असे भुजबळ म्हणाले.

केक खाण्यापेक्षा चर्चेत गैर काय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पाकिस्तानशी चर्चा करण्याचा उल्लेख आहे. यावर टीका होऊ लागली आहे. मात्र, पाकिस्तानात जाऊन केक खाण्यापेक्षा चर्चा केली तर गैर काय, असा सवालही त्यांनी केला.

Web Title: threat to Modi opponents fears