Loksabha 2019 : सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न

Loksabha 2019 : सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न

इंदापूर -  बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. पण, युतीचा उमेदवार अद्याप गुलदस्तात आहे. भारतीय जनता पक्षाने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील किंवा कर्मयोगी कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांना गळ घालण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सुळे यांच्या विरोधात कोण लढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

केंद्र व राज्यात सन २०१४ मध्ये भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आल्यानंतर तालुक्‍यात दोन्ही पक्ष संघटना वाढणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. भाजपच्या जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनभेद आहेत. तसेच, सत्तेची फळे निष्ठावंतांऐवजी नव्यांना मिळत असल्याने भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. शिवसेनेस सत्तेत संधी मिळूनसुद्धा त्यांना त्याचे सोने करता आले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगर परिषद निवडणुकीत दोन्ही पक्षांची ताकद नगण्य राहिली. 

पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेससमवेत सर्वाधिक कार्यक्रम केल्याने भाजपची वाढ खुंटली, तर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी तालुक्‍यात सोईस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे खासदार सुळे यांच्यापुढे सध्या तरी तगडे आव्हान दिसत नाही. खासदार सुळे व आमदार दत्तात्रेय भरणे यांचा प्रभावी जनसंपर्क, विरोधी खासदार व आमदार असतानासुद्धा त्यांनी आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी खेचलेला १२५ कोटी रुपयांचा निधी, जिल्हा बॅंक तसेच बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे सुळे यांच्या मताधिक्‍क्‍यात वाढ अपेक्षित आहे. 

इंदापूर मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताकदीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. 

इंदापूर हा काँग्रेसचा १९५२ पासून काही अपवाद वगळता बालेकिल्ला राहिलेला आहे. पण, २०१४ विधानसभा निवडणुकीत हा बुरूज ढासळला. सन २००४ मध्ये प्रदीप गारटकर यांना विधानसभा निवडणुकीत ७२ हजार, तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना तालुक्‍यात ६५ हजार ६८७ मते मिळाली होती. उपरोक्त निवडणुकीत शिवसेनेचे विशाल बोंद्रे यांनी प्रचारप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यामुळे १०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने बोंद्रे यांना उमेदवारी दिली. पण, त्यांना केवळ २ हजार १७८ मते पडल्याने ते अडगळीत पडले.

इंदापूर तालुक्यात उलथापालथीची शक्‍यता
मागील विधानसभेत निवडणुकीपासून शिवसेनेचे विशाल बोंद्रे हे काहीसे अडगळीत पडलेले दिसत आहेत. मात्र, त्यांनी तयार केलेले कार्यकर्ते त्यांच्यासोबतच असून, ‘शिवसेना सोडा’ असा तगादा त्यांनी बोंद्रे  यांच्या मागे लावला आहे. त्यामुळे निवडणुकीत इंदापूर तालुक्‍यात राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ राष्ट्रवादीला मागील विधानसभेप्रमाणे होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com