Loksabha 2019 :  उमेदवारीच्या घोळामुळे वैतागले कार्यकर्ते

Loksabha 2019 :  उमेदवारीच्या घोळामुळे वैतागले कार्यकर्ते

औरंगाबादमधून इच्छुक असलेले सुभाष झांबड यांना तर अखेर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क करावा लागला. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार आणि सुभाष झांबड यांच्यातील वाद विकोपाला गेल्यनंतर अखेर झांबड यांनाच रिंगणात उतरवण्यात आले. झांबडांच्या विरोधात सत्तार यांनी दंड थोपटून पक्षाच्या निर्णयाला उघडपणे विरोध केला. त्यामुळे अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढवणार का? हा कळीचा मुद्दा आहे. 

पक्षाच्या बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिले, तर काँग्रेसचे कार्यकर्ते राजीनामे देतील, असा निर्वाणीचा इशारा झांबडसमर्थकांनी दिला होता. रवींद्र बनसोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे, असा सत्तार यांनी अखेरपर्यंत आग्रह धरला. त्यामुळे काँग्रेसमधील सुंदोपसुंदी अधिकच वाढली. 

‘एमआयएम’ची भूमिका निर्णायक
अशीच काहीशी परिस्थिती शिवसेना-भाजपमध्येही होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवेसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत दोन्ही पक्षांचा संयुक्त मेळावा घेऊन त्यावर डागडुजी केली. तरीही खैरे यांना दरवेळीप्रमाणेच मेहनत करावी लागणार, असे दिसते. दरवेळी खैरे यांच्याविरुद्ध नाराजी असल्याने ते पराभूत होतील, या एकाच मुद्‌द्‌यावर उमेदवार रिंगणात उतरवले जातात. तेही शेवटच्या क्षणापर्यंत कोणतेही नियोजन न करता. याही वेळी परिस्थिती तशीच आहे. ‘एमआयएम’ची भूमिका औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे. केवळ शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराचा विजय होऊ नये म्हणून ‘एमआयएम’ने ही जागा लढवू नये, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. याउलट मागच्या चार वेळा ‘एमआयएम’ नसतानाही काँग्रेस पराभूत झाली, याचा सोयीस्कर विसर काँग्रेस नेत्यांना पडतो, हे जरा आश्‍चर्यकारकच आहे. खरेतर ‘एमआयएम’ हा स्वतंत्र पक्ष असून, औरंगाबादमधील अस्तित्वासाठी ते निर्णय घेणार आहेत. त्याचा काँग्रेसच्या उमेदवारीशी संबंध जोडणेच अनाठायी आहे. ‘एमआयएम’ने निवडणूक लढवायची किंवा नाही, हा विषय त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी बाजूलाच ठेवायला हवा. 

युतीत तणाव
शिवसेना-भाजप युतीत प्रचंड तणाव असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. निवडणुकीच्या काळात ते जाणवत आहे. याचा फायदा घेण्याची संधी वाया घालवून काँग्रेसने उमेदवारीचा जो खेळ मांडला, त्याला काँग्रेस पक्षाचेच कार्यकर्ते वैतागले आहेत. हीच अवस्था जालना लोकसभा मतदारसंघातही आहे. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी शेवटपर्यंत रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध दंड थोपटून शेवटी माघार घेतली. खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या. प्रत्यक्षात झाले भलतेच. काँग्रेसने विलास औताडे यांना उमेदवारी देत दानवेंना आव्हान देण्याचा प्रयत्न चालवला आहे. डॉ. कल्याण काळे यांना औरंगाबाद आणि जालना दोन्ही ठिकाणांहून या वेळी निवडणूक लढवायची नाही. उस्मानाबादमध्येही शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना बदलून ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणा जगजितसिंह यांची उमेदवारी जाहीर झाली. ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह यांच्यातील लढत रंजक ठरणार आहे. 

बीड पुन्हा चर्चेत
बीड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अखेरपर्यंत अमरसिंह पंडित यांचे नाव चर्चेत राहिले. प्रत्यक्षात ऐनवेळी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. बीडमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संपर्क साधला होता. भाजपविरुद्ध राष्ट्रवादी ही लढत परंपरेनुसार होईल, अशी चिन्हे आहेत. काही अपवादात्मक वेळीच राष्ट्रवादीने या मतदारसंघात चुरस निर्माण केली होती. या वेळीही लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com