LokSabha 2019 : लातूरमध्ये भाजपकडून शक्ती प्रदर्शन; काँग्रेस मात्र शांतच

BJP and Congress
BJP and Congress

लातूर : लातूर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा आज शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल झाला. जाहिर सभा, रॅलीतून हे शक्ती प्रदर्शन करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न नेत्यांनी केला. तर दुसरीकडे मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात जावून पक्षाचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

या मतदार संघात मंगळवारी (ता. 26) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या निमित्ताने प्रचाराचा प्रारंभ करून शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली जात होती. मंगळवारी दुपारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या निमित्ताने टाऊन हॉलच्या मैदानावर प्रचाराच्या प्रारंभासाठी जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजल्यापासून कार्यकर्ते एकत्र येवू लागले. प्रत्येक पदाधिकाऱयांवर नागरीकांना आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ग्रामीण भागातूनही कार्यकर्ते सभेसाठी आले होते. या निमित्ताने निलंगेकर यांच्या नेतृत्वात शक्ती प्रदर्शन करून वातावरण निर्मिती करण्यात पक्षाला यश आले. त्यानंतर टाऊन हॉल ते शिवाजी चौक अशी रॅलीही काढण्यात आली. पक्षाचे झेंडे, टोप्या खालून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर शिवाजी चौकात  निलंगेकर यांनी जाहिर भाषण करून शृंगारे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता, जाहिर सभा न घेता सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात जावून पक्षाचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजीमंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, माजी आमदार बाबासाहेब पाटील, शैलेश पाटील चाकूरकर, माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com