Loksabha 2019 : 'आयोगाच्या सूचनांनुसार मतदारांना सुविधा द्या'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार सर्व यंत्रणांनी काम करावे, अशा सूचना नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिस प्रशासनाला निवडणूक निरीक्षक ब्रज मोहन कुमार यांनी आज (ता.04) दिल्या आहेत. 

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार सर्व यंत्रणांनी काम करावे, अशा सूचना नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिस प्रशासनाला निवडणूक निरीक्षक ब्रज मोहन कुमार यांनी आज (ता.04) दिल्या आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आढावा बैठकीत ब्रज मोहन कुमार बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश श्रींगी, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे व औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती.

निवडणूक निरीक्षक ब्रज मोहन कुमार म्हणाले, आयोगाने आदर्श आचारसंहिता पालन व्हावे या दृष्टीकोनातून विविध सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्या सूचनांनुसार निवडणूक निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी कार्य करावे. निवडणूक आयोगापर्यंत प्राप्त तक्रारींवर तक्रारदारांना तत्काळ प्रतिसाद देऊन तक्रारींचा निपटारा करावा. मतदानपूर्व आणि  मतदानानंतर करावयाची सर्व कामे वेळेत व नियोजनपूर्वक करावीत.

पोलिस प्रशासनाने उत्सव, सण आणि जयंती व निवडणूक आदींबाबत पूरक पोलिस बंदोबस्त ठेवावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असे नियोजन करावे.
जिल्हा परिषद, स्वीपच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेवटच्या मतदारांपर्यंत मतदान करण्याबाबत जनजागृती करावी. मतदान केंद्रांवर संपर्क व्यवस्था, वीज आणि पाण्याबरोबरच महिला आणि दिव्यांग मतदारांना आवश्यक व्यवस्था, सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांनी कार्यवाही पार पाडावी. मतदारांना मतदान करताना आवश्यक असलेल्या ओळखपत्रांबाबतही जागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघात मतदार, नवमतदारांमध्ये केलेली जागृती, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, स्वीप कार्यक्रम, दिव्यांग, गरोदरमाता, स्तनदा मातांसाठी मतदानाच्या दिवशी केलेली व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, निवडणूक कामासाठी असलेले मनुष्यबळ, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस कूमक, आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी स्थापन केलेले कक्ष, कक्षांचे कामकाज, कक्षांकडून करण्यात आलेली कार्यवाही आणि निवडणुकीशी संबंधित सर्व कामकाजाचे नियोजन व केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर सादरीकरण केले. श्रीमती कौर, श्रीमती पाटील यांनीही निवडणुकीशी संबंधित नियोजन आणि कार्यवाहीबाबत निवडणूक निरीक्षक ब्रजमोहन कुमार यांना सविस्तर माहिती दिली.

Web Title: Brij Mohan Kumar Says Provide voters convenience as per commission instructions in Aurangabad