Loksabha 2019: हिंगोलीत निवडणूक निरीक्षकांचा थयथयाट

मंगेश शेवाळकर
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्र ताब्‍यात घेवून सिल करण्यासाठी शुक्रवारी (ता. 19) क्षुल्‍लक कारणावरून निवडणूक निरीक्षकांना चांगलाच थयथयाट केला. तर दुसरीकडे जिल्‍हा प्रशासनाच्‍या समन्वयाचा अभावही दिसून आल्‍याने निवडणूक कामात असलेले अधिकारी मानसिक तणावाखाली आले आहेत.

हिंगोली ः लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्र ताब्‍यात घेवून सिल करण्यासाठी शुक्रवारी (ता. 19) क्षुल्‍लक कारणावरून निवडणूक निरीक्षकांना चांगलाच थयथयाट केला. तर दुसरीकडे जिल्‍हा प्रशासनाच्‍या समन्वयाचा अभावही दिसून आल्‍याने निवडणूक कामात असलेले अधिकारी मानसिक तणावाखाली आले आहेत.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोलीसह वसमत, कळमनुरी, उमरखेड, किनवट, हदगाव आदी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या विधानसभा मतदारसंघातील सुमारे 1989 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्‍यानंतर सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्‍यानंतर मतपेट्या त्‍या त्‍या विधानसभा मतदारसंघाच्‍या उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणण्यात आल्‍या. त्‍यानंतर आज सकाळी या मतपेट्या शासकीय तंत्रनिकेतनमधील स्‍ट्राँगरूम येथे आणण्यात आल्‍या होत्‍या.

सकाळी सहा वाजल्‍यापासून या मतपेट्या सिल करून व्यवस्‍थित ठेवण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार होती. मात्र निवडणूक निरीक्षकांनी राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांच्‍या उपस्‍थितीत मतपेट्या सिल करणे आवश्यक आहे. हे पदाधिकारी का उपस्‍थित नाहीत असा सवाल करत चांगलाच थयथयाट सुरु केला. राजकीय पक्षांना या ठिकाणी उपस्‍थित राहण्याबाबत कळवले का अशी विचारणा निवडणूक विभागाच्‍या अधिकाऱ्यांना केली. त्‍यानंतर याबाबत राजकीय पक्षांना पाठवलेल्‍या पत्राची परत निरीक्षकांना दाखवले. मात्र त्‍यावर त्‍यांचे समाधान झाले नाही. या पत्रावर कोणत्‍या वेळी हजर रहावे हे का नमूद केले नाही अशी विचारणा करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. निरीक्षकांचा पारा चढल्‍यानंतर एका तहसीलदारास शहरामध्ये पाठवून राजकीय पक्षाचे प्रतिनिधी बोलावण्यात आले. मात्र त्‍यांच्‍याकडे ओळखपत्र नसल्‍याच्‍या कारणावरून निरीक्षकांनी त्‍यांनाही अपमानित केले. या प्रकारामुळे जिल्‍हा निवडणूक विभागाच्‍या समन्वयाचा अभाव उघड झाला. त्‍यानंतर निरीक्षकांना समजावून सांगितल्‍यानंतर मतपेट्या सिल करून स्‍ट्राँग रुममध्ये ठेवण्याचे काम आज सकाळी साडेसात वाजता सुरु करण्यात आले. 

दरम्‍यान, या वेळी निरीक्षकांनी जिल्‍हा निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांच्‍या निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची भाषाही वापरल्‍याचे समजते. निरीक्षकांच्‍या या प्रतिक्रियावरून लोकसभा निवडणुकीच्‍या कामकाजात असलेले अधिकारी व कर्मचारी चांगलेच मानसिक तणावाखाली आल्‍याचे चित्र आहे. या संदर्भात जिल्‍हा प्रशासनाशी संपर्क साधला असता त्‍यांच्‍याशी संपर्क होवू शकला नाही. तर सदर प्रकार स्‍ट्राँग रुम परिसरातील सीसी टिव्‍ही कॅमेऱ्यामध्ये कैद असल्‍याचे बोलले जात आहे.

Web Title: Election Inspector under stress in Hingoli Loksabha