Loksabha 2019 : हिंगोली लोकसभा मतदार संघात लोकशाहीच्या उत्सवासाठी कर्मचारी केंद्रावर रवाना

मंगेश शेवाळकर
बुधवार, 17 एप्रिल 2019

हिंगोली मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी बुधवारी (ता. 17) सकाळपासूनच आवश्यक साहित्यासह रवाना झाले आहेत. 

लोकशाही 2019
हिंगोली : लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी बुधवारी (ता. 17) सकाळपासूनच आवश्यक साहित्यासह रवाना झाले आहेत. 

हिंगोली लोकसभा मतदार संघात गुरुवारी (ता. 18) मतदान होणार आहे. लोकसभा मतदार संघात एक हजार 189 मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान होणार असून त्यासाठी सुमारे साडे आठ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे, प्रविण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीबाबत वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होऊन मतदान करावे यासाठी जनजागृती देखील करण्यात आली आहे. विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थेकडूनही यामध्ये सहभाग नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, आज मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर आवश्यक असलेली कागदपत्रे, साहित्यासोबतच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी महामंडळाच्या बसेस, खाजगी बसेस, जीपचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी जादा पोलिस बंदोबस्तही रवाना करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजल्या पासून मतदान प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

Web Title: Election squad has left for the Election booth center in the Lok Sabha constituency