Loksabha 2019 : लातूरच्या मार्केट यार्डात घुमला निलंगेकरांचा आवाज

हरी तुगावकर
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

लातूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी मार्केट यार्डात सभा झाली.

लोकसभा 2019
लातूर : देशात डाळीचा भाव काढणारा बाजार म्हणून लातूर उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डाची ओळख आहे. तसेच राजकीय दृष्ट्या देखील या मार्केट यार्डाला महत्व आहे. येथून एखादा निर्णय घेतला गेला तर त्याचे परिणाम ग्रामीण भागात दिसत असतात. अशा या मार्केट यार्डात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी जाहिर सभा घेतली. बाजार समितीचा नीट कारभार करा अन्यथा आम्हाला लक्ष घालावे लागेल, असे आव्हानच त्यांनी अप्रत्यक्षरीत्या आमदार अमित देशमुख यांना दिले.

लातूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी मार्केट यार्डात सभा झाली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूरची ओळख ही कोण्या एका राजकीय व्यक्तीमुळे देशात झाली नाही तर येथील व्यापारी, शेतकरी, कष्टकरी यांच्या परिश्रमामुळे झाली आहे. या बाजारपेठेचा जो निर्णय असतो तोच जिल्ह्याचा निर्णय असतो. या बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता आहे. पाच वर्ष आम्ही कधीच हस्तक्षेप केला नाही. पण येथील सभापती बाहुला बनला आहे. शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. एक महिन्याची संधी देतो. कामात सुधारणा करा. शेतकरी, व्यापारी, हमालाना त्रास होणार असेल तर तुमच्याकडे पहावे लागेल अशा शब्दात श्री. निलंगेकर यांनी सुनावले.

Web Title: Guardian Minister Sambhaji Patil Nilangekars public meeting in latur