Loksabha 2019 : चौरंगी लढतीत काट्याची टक्कर

शेखलाल शेख
शनिवार, 13 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रश्‍न

  • शहरातील गंभीर पाणी समस्या, पाचव्या दिवशीसुद्धा नाही पाणी
  • धगधगणारा कचरा प्रश्‍न, अंतर्गत रस्त्यांची चाळणी 
  • वाळुज, रेल्वेस्टेशन, पैठण, शेंद्रातील रखडलेला औद्योगिक विकास 
  • रोजगार निर्मिती घटल्याने युवकवर्ग नाराज
  • दुष्काळाने चारा, पाणीप्रश्‍न गंभीर, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा

औरंगाबाद मतदारसंघात पहिल्यांदाच बहुरंगी लढत आहे. चार निवडणुकांत वर्चस्व गाजविणाऱ्या शिवसेनेचे भवितव्य मतांच्या फुटीवर अवलंबून आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर एमआयएम- वंचित बहुजन आघाडीचे आमदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे सुभाष झांबड, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांनी रणशिंग फुंकले आहे.

औरंगाबाद मतदारसंघात धार्मिक, जातीय धुव्रीकरण नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आल्याने ऐन निवडणुकीच्या दिवसांत विकासाचे मुद्दे बाजूला पडतात. मात्र, यंदा शहरात गंभीर झालेल्या पाणी, कचऱ्याच्या समस्येमुळे चंद्रकांत खैरे यांना लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. त्यातच त्यांना भाजपकडून अद्याप हवी तशी साथ मिळालेली नाही. दुसरीकडे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन मैदानात उडी घेतली. त्यांना जय बाबाजी भक्त परिवाराने जाहीर पाठिंबा दिलाय. 

अशीच स्थिती काँग्रेसचे सुभाष झांबड यांची असून, त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता माघार घेतलेली असली तरी त्यांनी काँग्रेसचे काम करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून ‘एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम- दलितबहुल भागात जोर लावल्याने चौरंगी लढतीच्या मतविभाजनात कोण जिंकणार, कोण कुणाची किती मते खाणार, याची चर्चा जोरात आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Aurangabad Constituency Politics