Loksabha 2019 : जालन्याच्या खासदारांसाठी औरंगाबादचे मतदार निर्णायक

शेखलाल शेख
गुरुवार, 28 मार्च 2019

लोकसभेच्या जालना मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या तीन मतदारसंघांतील एकूण ९ लाख २२ हजार २५ मतदार आहेत.

औरंगाबाद - लोकसभेच्या जालना मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या तीन मतदारसंघांतील एकूण ९ लाख २२ हजार २५ मतदार आहेत. तर जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत ९ लाख २१ हजार १०६ मतदार आहेत. त्यामुळे जालन्याचा खासदार ठरविताना औरंगाबाद जिल्ह्यातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. 

सध्या जालना मतदारसंघात प्रमुख पक्षांचे २०१४ मधीलच उमेदवार २०१९ साठी मैदानात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेसकडून विलास औताडे, तर २०१४ मध्ये बहुजन समाज पक्षाकडून लढणारे डॉ. शरदचंद्र वानखेडे आता वंचित बहुजन आघाडीकडून मैदानात आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील मतदार जास्त
लोकसभेच्या जालना मतदारसंघाचा विचार केला तर औरंगाबाद जिल्ह्यातील मतदार जास्त आहेत. जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघात ३ लाख १५ हजार ०४, जालना विधानसभा मतदारसंघात ३ लाख २० हजार ४७२, तर भोकरदनमध्ये २ लाख ९९ हजार १३० असे एकूण ९ लाख २१ हजार १०६ मतदार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात ३ लाख १४ हजार ५७०, फुलंब्री ३ लाख १८ हजार ६९५, पैठण २ लाख ८८ हजार ७६० असे एकूण ९ लाख २२ हजार २५ मतदार आहेत. याशिवाय फुंलब्री विधानसभा मतदारसंघात औरंगाबाद महापालिकेतील दहा वॉर्डांचा समावेश होतो. या दहा वॉर्डांत जवळपास ७३ हजार मतदार आहेत. त्यामुळे जालन्याच्या खासदार ठरविण्यात औरंगाबाद शहरातील मतदारांची भूमिकाही महत्त्वाची राहील.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
जालना - ३,२०,४७२
बदनापूर - ३,०१,५०४
भोकरदन - २,९९,१३०
सिल्लोड-सोयगाव - ३,१४,५७०
फुलंब्री - ३,१८,६९५
पैठण - २,८८,७६०
एकूण १८,४३,१३१
औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील एकूण मतदान -  ९,२२,०२५
जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील एकूण मतदान - ९,२१,१०६

जालना - २०१४ मधील निकाल
रावसाहेब दानवे (भाजप) - ५,९१,४२८ 
विलास औताडे (काँग्रेस) - ३,८४,६३०
डॉ. शरदचंद्र वानखेडे (बसप) - २३,७१९

Web Title: Loksabha Election 2019 Jalana MP Aurangabad Vote Politics