Loksabha 2019 : मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

मराठवाडा सुजलाम सुफलाम करू. पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. भाजपला साथ द्या, मराठवाड्याचे कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

लातूर - राज्यातील पाण्याची समस्या हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे. त्यांनी सिंचनात मोठा भ्रष्टाचार केला. त्यातून पंधरा वर्षांपासून अनेक प्रकल्प बंद पडले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. या प्रकल्पांसाठी ४० हजार कोटींचा निधी दिला आहे. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मराठवाड्याचे वाळवंट नव्हे, तर कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

लातूरमधील प्रचार सभेत ते बोलत होते. ‘लग्न भलत्याचेच झाले. त्यांना पोरं झाली. बाबा म्हणत ती आमच्या मांडीवर बसली. या पोरांना मांडीवर बसवून खेळवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस व माझ्यावर आली’, अशी अवस्था राज्यातील सिंचन प्रकल्पाची झाली आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी पंतप्रधान सिंचन व बळिराजा योजनेतून ४० हजार कोटींचा निधी दिला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अर्धवट सोडलेली ही सिंचनाची ‘स्मारके’ आम्ही पूर्ण करून दाखवू. दिलेला निधी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्म्याला वाहिलेली ‘श्रद्धांजली’ असेल, अशी टीका गडकरी यांनी केली.

ते म्हणाले, ‘आता नद्या जोड प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यात दमणगंगा पिंजार आणि तापी नार नर्मदा हे दोन प्रकल्प हाती घेतले आहेत. पहिल्या प्रकल्पावर धरण बांधून त्यातील पाणी गोदावरी नदीत सोडले जाणार आहे. यातून ते जायकवाडी प्रकल्पात आणले जाईल. यातून सर्व धरणे भरून घेतले जातील.

मराठवाडा सुजलाम सुफलाम करू. पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. भाजपला साथ द्या, मराठवाड्याचे कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

Web Title: Loksabha Election 2019 Marathwada california Nitin Gadkari Politics