Loksabha 2019 : दुहेरी लढतीला ‘वंचित’चे आव्हान

भास्कर बलखंडे
शनिवार, 13 एप्रिल 2019

जालन्यात भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातच सरळ सामना आहे. दानवेंना युतीचा लाभ होतोय, तर औताडेंना गटबाजी सतावत आहे. तरीदेखील त्यावर मात करीत ते प्रचार यंत्रणा राबवीत असल्याने सरळ सामना रंगणार आहे.

जालन्यात भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातच सरळ सामना आहे. दानवेंना युतीचा लाभ होतोय, तर औताडेंना गटबाजी सतावत आहे. तरीदेखील त्यावर मात करीत ते प्रचार यंत्रणा राबवीत असल्याने सरळ सामना रंगणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय वादामुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या जालना मतदारसंघात भाजपचे दानवे आणि काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात थेट लढत आहे. वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मतदारसंघात मोठी सभा घेऊन पूरक वातावरणनिर्मिती केली होती. त्यानंतर आघाडीचे इतर नेते इकडे न फिरकल्याने ‘वंचित’चे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांशी संपर्क साधत असले, तरी त्यांची दमछाक होत आहे. डॉ. वानखेडे किती मते खेचतात यावरच दानवे, औताडेंच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.

खोतकर यांनी वर्षभरापूर्वीच येथून दानवेंविरुद्ध लढणार असल्याचे जाहीर केले होते. निवडणूक जाहीर झाल्यावरही हेच वातावरण होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करीत दोघांतील वाद संपुष्टात आणला. त्यामुळे दोन्हीही पक्षांतील कार्यकर्ते दानवेंच्या प्रचाराला लागलेत. या घडामोडींमध्ये काँग्रेसला उमेदवार जाहीर करायला वेळ लागला. काँग्रेसने विलास औताडेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेतही औताडेंनी दानवे यांच्याशी चांगली झुंज दिली होती. उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने त्यांना मतदारांच्या भेटीगाठींसाठी कसरत करावी लागत आहे.

केंद्रातर्फे झालेली कामे हा प्रचाराचा मुद्दा दानवे उपस्थित करीत आहेत. दुसरीकडे, औताडेंना काँग्रेस अंतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागतेय.

प्रचारात त्यांच्यासोबत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांऐवजी राष्ट्रवादीचे पदाधिकारी सतत दिसताहेत. स्थानिक उमेदवाराची पक्ष पदाधिकाऱ्यांची मागणी होती. ती पूर्ण न झाल्याने स्थानिक काँग्रेसजनांत उत्साह कमी आहे. त्यांना बरोबर घेण्यासाठी औताडेंना कष्ट घ्यावे लागताहेत. सेवादलाच्या अध्यक्षपदावर केलेले काम ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांचे वडील केशवराव औताडे यांच्या जनसंपर्काचा त्यांना लाभ होऊ शकतो. विकासकामांना विलंब, हेच त्यांच्या प्रचाराचे भांडवल होऊ शकते.

Web Title: Loksabha Election 2019 Politics raosaheb danve vanchit bahujan aghadi