Loksabha 2019: मोदींची अवस्था "गजनी'तील नटासारखी- धनंजय मुंडे

राजेभाऊ मोगल
बुधवार, 3 एप्रिल 2019

- मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक
- देशात एकप्रकारची हुकूमशाही सुरू
- खोटी आश्वासने देणारे सरकार सत्तेवर

औरंगाबाद- खोटी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे. देशात एकप्रकारची हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

दरम्यान, बीडची निवडणूक माझ्यासाठी प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक मोठ्यांचे लेकरू विरुद्ध सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलगा अशी आहे, असे म्हणत त्यांनी भाजप नेत्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. 

सिडको परिसरातील शिवछत्रपती महाविद्यालयात मंगळवारी (ता. दोन) सायंकाळी सात वाजता बीड जिल्हा मित्रमंडळातर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बैठक झाली. त्या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, की मागील निवडणुकीत केलेले भाषण नरेंद्र मोदी यांनी पुन्हा ऐकले तर निवडणूक प्रचारासाठी कसे जावे, असा प्रश्न त्यांना पडल्याशिवाय राहणार नाही, त्यांची अवस्था गजनी चित्रपटातील नटासारखी झाली आहे.

बीडमध्ये एकाच कुटुंबाकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता आहे. असे असतानाही बीडचा विकास का झाला नाही. रेल्वे प्रश्नांसह अन्य प्रश्न का सुटले नाहीत, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. या वेळी आमदार सतीश चव्हाण, अभिजित देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. साळुंके, अभिजित देशमुख, दत्ता भांगे उपस्थित होते.

Web Title: Narendra Modi has lost his memory like Ghajini says Dhananjay Munde