Loksabha 2019: नाराज रविंद्र गायकवाड समर्थकांना मातोश्रीवर जाण्यापासून रोखले

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 मार्च 2019

- नाराज रविंद्र गायकवडांना मातोश्रीवर जाण्यापासून रोखले
- प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांत संतापाची लाट
- प्रा. गायकवाड यांच्यावर अन्याय झाल्याची शिवसैनिकांनी कडवट प्रतिक्रिया

उस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. 

शनिवारी (ता. २३) उमरगा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेचे वलय निर्माण केलेल्या प्रा. गायकवाड यांच्यावर झालेल्या अन्यायावर अनेक शिवसैनिकांनी कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर श्रेष्ठींने उमेदवारीबाबत पुनर्विचार करण्यासाठी शनिवारी रात्री मुंबईकडे निघालेल्या प्रा. गायकवाड समर्थक शिवसैनिकांची वाहने पोलिस यंत्रणेने ठिकठिकाणी अडविली आहेत. प्रा. गायकवाड यांच्या समर्थकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान रविवारी (ता. 24) सकाळी साडेदहा वाजता यापैकी बहुतांश कार्यकर्ते मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर पोचले आहेत.

एका मास लिडरला उमेदवारी नाकारल्याची संतप्त भावना प्रा. गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांना परत उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी शनिवारी रात्री खासगी बस, कार, जीपने आदी वाहनांतून कार्यकर्ते उमरगा, लोहारा येथून मुंबईकडे निघाले होते. पोलिसांनी दोन बस उमरगा हद्दीतच अडवून पोलिस ठाण्यात उभ्या केल्या आहेत. तुळजापूरलाही काही वाहने रात्रीच अडविली.

पोलिसांनी वाशी टोलनाक्यावर तीन ते चार खासगी बस अडविल्याची अधिकृत माहिती आहे. जवळपास 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा नोंदविण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याची माहिती एका कार्यकर्त्यांने दिली. शिवसेनेचे बसवराज वरनाळे, राजेंद्र कारभारी, शंकर लोभे, बळीमामा सुरवसे असे अनेक कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी थांबले आहेत. तेथून ते मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police gives notice to shiv sena leaders of osmanabad who are heading towards Matoshree