खोतकरांनी घेतली काॅंग्रेस जिल्हाध्यक्षांची भेट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास उत्सुक असलेले शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरुवारी (ता. 14) कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेत तासभर चर्चा केली. या भेटीमुळे खोतकर यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे.

औरंगाबाद - जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास उत्सुक असलेले शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरुवारी (ता. 14) कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेत तासभर चर्चा केली. या भेटीमुळे खोतकर यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे.

 लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही औरंगाबाद, जालना लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार कोण याविषयी सस्पेन्स कायम आहे. जालना मतदारसंघातून माजी आमदार डॉ. कल्याण काळे किंवा मी उमेदवार असेल, असे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी (ता. 13) एका पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र, अवघ्या चोवीस तासांतच वेगळ्याच हालचाली सुरू झाल्या आहेत. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खोतकरांबद्दल त्यांनी सूचक वक्तव्य केले होते. खोतकर हे मोठ्या मतांनी निवडून येतील, काही जण त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. खोतकर निवडणूक लढवितात की, रणछोडदास बनतात, हे तुम्ही त्यांनाच विचारा, असे सत्तार म्हणाले. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांत खोतकर यांनी सत्तार यांची भेट घेतली. शहरातील सातारा परिसरातील फिरोज पटेल यांच्या कार्यालयात सत्तार व खोतकर यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर सत्तार यांनी "आता बाण सुटलेला आहे आणि सुटलेला बाण कधी परत जात नाही, दोन दिवसांत गोड बातमी देतो,' असे सांगितले. 
 
'मी अजून मैदान सोडलेले नाही' 
 खोतकर यांनी लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्याविरोधात चारहात करण्याचे वारंवार जाहीर केले. शिवसेना, भाजप नेत्यांनी व स्वतः दानवे यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र "मी अजून मैदान सोडलेले नाही' असे वक्तव्य खोतकर वारंवार करत होते. त्यात गुरुवारी सत्तार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला बळकटी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sena's Arjun Khotkar Meets District Congress President