Loksabha 2019 : औरंगाबादमध्ये तिरंगी लढतीची शक्‍यता 

Loksabha2019
Loksabha2019

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेना-भाजप युतीकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे पाचव्यांदा मैदानात उतरले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतून कोण उमेदवार राहणार याविषयी शुक्रवारपर्यंत चर्चांना ऊधान आले होते. मात्र आघाडीतर्फे आमदार सुभाष झांबड यांच्या नावाच्या घोषणेने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र त्यांच्या नावाला घरातून विरोध झाला असून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. 

शिवसेना मराठवाड्यात येण्यापूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लोकसभा मतदारसंघात 1989 मध्ये मोरेश्‍वर सावे हे शिवसेनेचे पहिले खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1998 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता सातत्याने इथून शिवसेनेचाच खासदार राहिला आहे. 1999 मध्ये चंद्रकांत खैरे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि ते आता पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. खासदार खैरे रविवारपासून (ता.24) कन्नड तालुक्‍यापासून प्रचार दौऱ्याला सुरवात करणार आहेत. जनतेशी थेट संबंध, लोकांना भेटीसाठी केव्हाही उपलब्ध राहणे ही त्यांची बलस्थाने आहेत. पक्षांतर्गत नाराजी असली तरी शिवसैनिक निवडणुकीत मात्र प्रामाणिकपणे काम करतात असा अनुभव आहे. ग्रामीण भागात
शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे. 

आघाडीतर्फे सुभाष झांबड यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाले. श्री. झांबड हे वैजापूर तालुक्‍यातील असून, त्यांना काही प्रमाणात चांगला फायदा होऊ शकतो. गेल्या वर्ष दीडवर्षापासून ते लोकसभेची तयारी करीत असून त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळेही विणले आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला विरोध करत खुद्द कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनीच बंडाचे निशाण फडकावले आहे. ऐन निवडणुकीत जिल्हाध्यक्षांची मतदानाच्या दिवसापर्यंत नाराजी ओढवून घेणे श्री. झांबड यांनाही परवडणारे नाही. सध्यातरी चंद्रकांत खैरे, सुभाष झांबड व अब्दुल सत्तार आमनेसामने आल्याचे सध्यातरी चित्र आहे. 
  
आतापर्यंतचे खासदार 
 

  • 1951 : सुरेशचंद्र (कॉंग्रेस) 
  • 1957 : स्वामी रामानंद तीर्थ (कॉंग्रेस) 
  • 1962 : भाऊराव देशमुख (कॉंग्रेस) 
  • 1971 : माणिकराव पालोदकर (कॉंग्रेस) 
  • 1977 : बापूसाहेब काळदाते (जनता पार्टी) 
  • 1980 : काझी सलीम (कॉंग्रेस) 
  • 1984 : साहेबराव पाटील डोणगावकर (एस. कॉंग्रेस) 
  • 1989 : मोरेश्‍वर सावे (शिवसेना) 
  • 1991 : मोरेश्‍वर सावे (शिवसेना) 
  • 1996 : प्रदीप जैस्वाल (शिवसेना) 
  • 1998 : रामकृष्णबाबा पाटील (कॉंग्रेस ) 
  • 1999 (पासून आजतागायत) : चंद्रकांत खैरे (शिवसेना) 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com