Loksabha 2019 : माढयाचा तिढा अजूनही कायम; राष्ट्रवादीत संभ्रम

भारत नागणे
शुक्रवार, 15 मार्च 2019

पवारांनी निवडणूकीच्या दृष्टीने कार्यकर्त्याेचे मेळावे घेवून पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान ऐनवेळी पवारांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करताच माढ्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याचीच उत्सुकता शिगेला पोचली आहे. 

पंढरपूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसने आज राज्यातील पाच लाेकसभा मतदार संघातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, दुसऱ्या यादीतही माढ्याचा उमेदवार कोण? हे अजून स्पष्ट न झाल्याने माढयातील उमेदवारी बाबतचा आतुरता कायम आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख की माजी खासदार रणजितसिंह मोहिते या दोन नावावर पक्षात जोरदार खल सुरू असल्याची माहिती आहे.

माढ्यातून राष्ट्रवादीचे नेते खसदार शरद पवार यांनी अनपेक्षितपणे माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याविषयी मतदार संघात चर्चा रंगू लागल्या आहेत. माढ्यातून निवडणूक लढवर असल्याचे पवारांनीच जाहीर केल्यानंतर माढ्याच्या निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले होते. 

पवारांनी निवडणूकीच्या दृष्टीने कार्यकर्त्याेचे मेळावे घेवून पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान ऐनवेळी पवारांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करताच माढ्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याचीच उत्सुकता शिगेला पोचली आहे. 

सुरवातीपासून इच्छुक असलेले माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांनीही यापूर्वीच मतदार संघात फिरुन अंदाज घेतला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटलांनी आपल्या ऐवजी पुत्र रणजितसिंहांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही आहेत. परंतू पक्षातूनच रणजितसिंहांना प्रतिसाद मिळत नसल्याने मोहिते पक्षावर नाराज आहेत. याच नाराजीतून मध्यंतरी रणजितसिंहांनी भाजप नेते गिरीष महाजन यांची भेट घेतली होती. भेटीनंतर रणजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सुरु होती. सध्यातरी रणजितसिंहांची भाजप प्रवेशाची चर्चा थांबली असून ते राष्ट्रवादीकडून लढतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे देखील राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. तरीही संजय शिंदे यांना उमेदवारी मिळेल का? याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीचा उमेदवार कोण यावरच भाजपचा उमेदवार ठरणार आहे. राष्ट्रवादीने प्रभाकर देशमुखांना उमेदवारी दिली तर सहकारमंत्री सुभाष देशमुख निवडणूकीच्या रिंगणात उतरतील तर रणजितसिंह उमेदवार असतील तर भाजपला उमेदवारीसाठी शोधाशोध करावी लागणार आहे.
राष्ट्रवादीने दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये मावळ मधून पार्थ पवारांची उमेदवारी जाहीर केली.याचवेळी माढ्यातून रणजितसिंह किंवा प्रभाकर देशमुखांचे नाव जाहीर होईल असा अंदाज होता. परंतु आजही माढयातील उमेदवारीचा तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: The suspense of announcing the NCP candidate in Madha is continues