Loksabha 2019 : शिवसेनेच्या विरोधामुळे सोमय्यांचा पत्ता कट 

Loksabha 2019 :  शिवसेनेच्या विरोधामुळे सोमय्यांचा पत्ता कट 

मुंबई - शिवसेना- भाजप युती तुटल्यानंतर सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि "मातोश्री' यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवर भाजपने फुली मारली आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या कारभारातील भ्रष्टाचारावरून सोमय्या यांनी "मातोश्री'ला लक्ष्य केले होते. त्याच महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते मनोज कोटक यांना भाजपने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात चौकीदारी करणाऱ्या चौकीदाराचीच शिकार भाजपने केली आहे. शिवसेना आणि शिवसैनिक यांनी सातत्याने केलेल्या विरोधापुढे भाजपच्या श्रेष्ठींनी नमते धोरण घेतले असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना- भाजपची युती झाली आहे. शिवसेनेने ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांना कडाडून विरोध केला होता. त्यातच स्थानिक शिवसैनिकांविरोधात सोमय्या यांनी सातत्याने भूमिका घेत त्यांना त्रास दिल्याच्या तक्रारी "मातोश्री'वर करण्यात आल्या होत्या. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे गुजरातमध्ये गेले होते. या भेटीत सोमय्या यांचा प्रश्न निकाली काढला जाईल अशी शक्‍यता वर्तवली जात होती. सोमय्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी "एकच स्पिरीट, नो किरीट' अशी घोषणा करून विरोध दर्शवला होता. तसेच, शिवसेनेचे भांडूपचे आमदार सुनील राऊत यांनी अपक्ष लढण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे ईशान्य मुंबईतील जागेचा तिढा सुटत नव्हता, त्यामुळे दिल्लीत निर्णय होऊन अखेर सोमय्या यांचा पत्ता कापला गेला. 

मनोज कोटक माझा लहान भाऊ आहे. तो ईशान्य मुंबईचा अभिमान वाटावा असा खासदार होणार. तीन टर्मचा मुंबई महानगरपालिकेचा अनुभव, मुंबईच्या प्रश्‍नांची जाण असलेला तो उमेदवार आहे. महाराष्ट्रातील सगळ्यांत मोठ्या विजयांपैकी हा एक विजय असेल. 
- किरीट सोमय्या, भाजप नेते 

आम्ही दोघे मिळून प्रचार करणार आहोत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून जास्त खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सोमय्या माझा मनापासून प्रचार करतील याबाबत मला काही शंका नाही. 
- मनोज कोटक, भाजपचे ईशान्य मुंबईतील उमेदवार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com