Loksabha 2019 : ठाण्यातून लढण्यास गणेश नाईकांचा नकार 

Loksabha 2019 : ठाण्यातून लढण्यास गणेश नाईकांचा नकार 

नवी मुंबई -  ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी अखेर पक्षश्रेष्ठींना नकार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाईक यांच्या नकारामुळे पक्षनेतृत्वाने माजी खासदार आनंद परांजपे यांना उमेदवारीसाठी गळ घातल्याचे समजले आहे. परांजपे यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीतील नेत्यांमध्येही एकमत झाल्याची चर्चा आहे. परांजपे यांच्या उमेदवारीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ठाणे शहरात आयोजित केलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार संजीव नाईक यांची पीछेहाट झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ठाणे लोकसभा मतदारसंघाकरीता उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे. शिवसेना व भाजप एकत्र निवडणूक लढवत असल्याने पुन्हा संजीव नाईक यांना उमेदवारी देऊन पक्षश्रेष्ठींना धोका पत्करायचा नाही. त्यामुळे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी राष्ट्रवादीकडून खमका उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. पक्षातील इतर मातब्बर नेत्यांकडून उमेदवारीबाबत नकार घंटा आल्याने पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवाराबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. परंतु, मोदी लाटेतही नवी मुंबई महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचे काम करणाऱ्या गणेश नाईकांनाच संधी देण्याचा विचार पक्षश्रेष्ठींनी केला होता. त्याकरीता नाईक यांची गेल्या दोन आठवड्यांपासून मनधरणी करण्याचे काम सुरू आहेत; मात्र नाईकांनी त्याला नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

धोका पत्करायचा नाही 
लोकसभेत कदाचित मात खाल्ल्यास विधानसभेत कोंडी करून घेण्याचा धोका नाईकांना पत्करायचा नाही. त्यामुळे आता नाईकांऐवजी स्वच्छ प्रतिमेचा व तरुण चेहरा देण्यासाठी आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीत सुरू आहे. रेल्वेच्या प्रश्‍नांचा गाढा अभ्यास, दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांनी खासदार असताना केलेल्या कामांचा वारसा आदी मुद्द्यांवर परांजपे यांची जमेची बाजू आहे. बुधवारी ठाण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मिरा-भाईंदर, ठाणे व नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची बैठक लावली आहे. या बैठकीत परांजपे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. 

ठाणे लोकसभा मतदारसंघाकरीता उमेदवाराच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करणार आहेत. येत्या दोन दिवसांत ते उमेदवाराचे नाव घोषित करतील. ठाणे लोकसभेच्या उमेदवारीच्या नकाराबाबत गणेश नाईक यांनी काय निर्णय घेतला. तो आपल्याला माहीत नाही. फक्त जो उमेदवार मिळेल तो चांगला उमेदवार असेल हे निश्‍चित. 
- अनंत सुतार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

माझ्या नावाची चर्चा असल्याचे मला कळले आहे; परंतु अद्याप पक्षश्रेष्ठींकडून अधिकृतरित्या समजलेले नाही. पक्षाने संधी दिली तर नक्की काम करून दाखवू. पक्षाचे प्रभारी गणेश नाईक यांनी बोलवलेल्या बैठकीत आम्ही सर्व हजर होतो. यात पक्ष जो उमेदवार देईल त्याच्यासाठी काम करू. 
- आनंद परांजपे, माजी खासदार 

लोकसभा 2019

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com