Loksabha 2019 : नाराजीचा नव्हे तर जल्लोषाचा दिवस: किरीट सोमय्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

मनोज कोटक यांनी उमेदवारी जाहीर होताच खासदार किरीट सोमय्या यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. मनोज कोटक यांनी किरीट सोमय्या यांच्या पाया पडून गळाभेट घेतली.

मुंबई : भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कापत मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. कोटक यांनी सोमय्यांची तात्काळ भेटही घेतली. यावेळी किरीट सोमय्यांनी आपली नाराजी लपवत आनंद व्यक्त करताना आज नाराजीचा नव्हे तर जल्लोषाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

मनोज कोटक यांनी उमेदवारी जाहीर होताच खासदार किरीट सोमय्या यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. मनोज कोटक यांनी किरीट सोमय्या यांच्या पाया पडून गळाभेट घेतली. सोमय्या म्हणाले, 'माझ्या लहान भावाला लोकसभा निवडणूकीचे तिकीट मिळाल्याचा आनंद आहे. मनोज कोटक ईशान्य मुंबईचा खासदार होईल आणि लोकसभेत तो मुंबईचं उत्तमपणे प्रतिनिधीत्व करेल, असा विश्वास वाटतो. तरुण, तडफदार मनोजला मुंबईच्या समस्यांची चांगली जाण आहे. महापालिकेत काम केल्याने त्याला शहराचे प्रश्न माहिती आहेत. मुंबईकरांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी तो लोकसभेत करेल.'

यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिल्याबद्दल कोटक यांनी पक्ष नेतृत्त्वाचे आभार मानले. 'पक्ष नेतृत्त्वानं माझ्यावर विश्वास दाखवला. सोमय्या यांच्या आशीर्वादाने पक्षाने दिलेली कामगिरी नक्की पार पाडेन. किरीट सोमय्यांनी त्यांच्या कामाचा ठसा ईशान्य मुंबईत उमटवला आहे. त्यांच्या कामांना गती देण्याचे काम करण्यात येईल. ईशान्य मुंबईसह संपूर्ण शहराचा विकास माझ्या अजेंड्यावर असेल,' असे कोटक म्हणाल्या.

Web Title: im happy today says bjp mp kirit somaiya after Dropped from List of Contenders