Loksabha 2019 : ‘रासप’चा चौथ्या आघाडीचा पुकारा

Mahadev-jankar
Mahadev-jankar

मुंबई - राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली असून, संभाव्य चौथ्या आघाडीचा पुकारा केला आहे. 

शेट्टी आणि जानकर यांच्या भेटीने भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या घटक पक्षांत हालचाली सुरू होणार आहेत. या संभाव्य आघाडीत राजू शेट्टी, रामदास आठवले, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, प्रकाश आंबेडकर यांना सहभागी होण्याचे निमंत्रण देणार असल्याचे जानकर यांनी म्हटले आहे. मात्र लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर युती आणि आघाडीच्या छत्राखाली जमू पाहणारे घटक पक्ष इतक्‍या झटपट निर्णय घेतील याची शक्‍यता कमीच असल्याचे मानले जाते. मागील लोकसभा निवडणुकीत जानकर यांना भाजपने बारामतीतून उमेदवारी दिली होती.

या वेळी जानकर हे माढा आणि बारामतीमधून उभारण्यास इच्छुक असले तरी भाजप जानकर यांना उमेदवारी देण्याच्या स्थितीत नाही. याची कुणकुण जानकर यांना लागलेली असल्यामुळे जानकर यांनी भाजपवर दबाव आणण्यासाठी चौथ्या आघाडीचा घाट घातल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येते.

महादेव जानकर यांची पुण्यात आज मी भेट घेतली. परंतु आमच्या स्वाभिमानी पक्षाने काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ला उद्यापर्यंतची वेळ दिली आहे. त्यानंतर आम्ही राज्यातील मतदारसंघांत स्वबळावर उमेदवार उभे करणार आहोत.
- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी पक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com