Loksabha 2019 : विजयासाठी पदाधिकाऱ्यांना ‘बंधन’

शरद भसाळे
रविवार, 21 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रश्‍न

  • यंत्रमागाचा ज्वलंत प्रश्न अनुत्तरित
  • भिवंडी-मुंबई लोकल रेल्वेसेवा
  • अनियमित वीजपुरवठा, वाढीव वीजबिले
  • यंत्रमाग उद्योगास जीएसटी व नोटाबंदीचा फटका
  • शहरी भागास सतावणारी वाहतूक कोंडी

उमेदवारांच्या विजयासाठी युती आणि आघाडी यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे. कार्यकर्त्यांचे बळ असले, तरी निवडक नेते आणि कार्यकर्त्यांतील नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. नागरी प्रश्‍नही ऐरणीवर आल्याने त्यांचा प्रभाव जाणवत आहे.

भिवंडीतील यंत्रमागधारकांचे प्रश्‍न सोडविण्यात भाजपला अपयश आले असून जीएसटी, नोटाबंदी, वीज आणि पाणी या प्रश्‍नांवरून येथील नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीचा सूर आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी काही कामे केली असली, तरी भाजपच्या मुस्लिमविरोधी भूमिकेचा त्यांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्‍यता आहे. मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात असले, तरीही कपिल पाटील आणि काँग्रेस आघाडीचे सुरेश टावरे यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कपिल पाटील यांच्यासाठी भाजप आणि शिवसेनेची बूथ यंत्रणा सक्रिय केली आहे. भिवंडी मतदारसंघात शिवसेनेचे दोन, तर भाजपचे तीन आमदार आहेत. त्याचा लाभ पाटील यांना होऊ शकतो. मतदारसंघात राष्ट्रवादीचे एकच आमदार आहेत. भिवंडी महापालिकेत भाजपचे १९, तर शिवसेनेचे १२ नगरसेवक आहेत. त्या तुलनेत काँग्रेसकडे ४७ नगरसेवक आहेत. याचा फायदा सुरेश टावरेंना होऊ शकतो.

मतदारसंघातील शिवसेनेचे जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे यांच्यासह काही शिवसैनिक विरोधात आहेत. ते प्रचारात अद्याप सहभागी नाहीत. कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी गतवेळी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. मात्र, आता त्यांनी भाजप उमेदवार कपिल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. सध्या प्रचारात भाजपने आघाडी घेतली असली; तरीही सत्ताधारी आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य अशा पदाधिकाऱ्यांना दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या विजयासाठी बांधलेले ‘बंधन’ काय करिष्मा दाखविणार, यावर सारे अवलंबून आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Bhiwandi Constituency Yuti Aghadi Politics