Loksabha 2019 : भाजप जाहीरनाम्यात ‘प्रिंट मिस्टेक’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

निर्मात्यांना निवडणूक आयोगाच्या नोटिसा
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून सरकारच्या विविध योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली असून, असा प्रचार करणाऱ्या ‘झी टीव्ही’ व ‘अँड टीव्ही’वरील मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात प्रिंट मिस्टेक झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. ‘महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत यासाठी कठोर कायदे केले आहेत,’ असे वाक्‍य छापून आल्याने भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

भाजपने छापलेल्या ४५ पानांच्या ‘संकल्पपत्रा’तील ३१ आणि ३२व्या पानावर महिला सुरक्षेसंदर्भातील आश्वासनांची माहिती देण्यात आली आहे. यापैकी ३२ व्या पानावरील ११ व्या मुद्द्यात भाजपकडून एक मोठी चूक झाली आहे. 

महिलांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल. आम्ही गृह मंत्रालयात महिला सुरक्षा विभागाची स्थापना केली आहे. तसेच ‘महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत यासाठी कठोर कायदे केले आहेत.’ त्यामुळे कमीतकमी वेळात तपास करून बलात्काराच्या प्रकरणांमध्ये तातडीने सुनावणी सुरू होते. अशा प्रकरणांमध्ये न्यायदान जलदगतीने होण्यासाठी जलदगती न्यायालयांचा विस्तार करण्यात येईल, असे भाजपने म्हटले आहे. अकराव्या मुद्द्यातील दुसऱ्या ओळीमध्ये महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत, यासाठी कठोर कायदे केले आहेत, असे छापण्यात आले आहे. वास्तविक पाहता ते वाक्‍य ‘महिलांविरुद्ध गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे केले आहेत,’ असे असणे अपेक्षित होते. काँग्रेससह ‘आप’ने याच मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली.

Web Title: Loksabha Election 2019 BJP Declaration Print Mistake