Loksabha 2019 : काँग्रेसचे कोळंबकर शिवसेनेच्या प्रचारात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 एप्रिल 2019

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेला पक्षशिस्तीचे उल्लंघन करण्याचा शिरस्ता पक्षातील आमदारांनीही खुलेआमपणे सुरू ठेवला आहे. काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना जाहीर पाठिंबा देत त्यांचे पक्षकार्यालयात स्वागत केले.

मुंबई - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेला पक्षशिस्तीचे उल्लंघन करण्याचा शिरस्ता पक्षातील आमदारांनीही खुलेआमपणे सुरू ठेवला आहे. काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना जाहीर पाठिंबा देत त्यांचे पक्षकार्यालयात स्वागत केले. इतकेच नव्हे, तर निवडणुकीत राहुल शेवाळेंचा प्रचार करणार असल्याचेही उघडपणे मान्य केले. 

नव्याने मुंबई काँग्रेसचा पदभार सांभाळणाऱ्या मिलिंद देवरा यांनी मात्र कोळंबकर यांच्याकडे दुर्लक्ष करत याबाबत अधिक माहिती घेऊन कारवाई करू, अशी मोघम प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्यात काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या बेबंदशाहीला आवर घालण्यासही कोणी पुढे येताना दिसत नाही. विखे यांचा मुलगा सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट विखेंनी सुजय यांच्या प्रचाराची धुराही सांभाळली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत पक्षातील आमदारही पक्षाच्या विरोधात उघडपणे कारवाया करू लागले आहेत; मात्र काँग्रेसमध्ये त्यांना जाब विचारायलाही कोणी नाही.  

शेवाळेंनी आज नायगाव येथील कोळंबकर यांच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर कोळंबकर यांनी काँग्रेसवर नाराज असल्यानेच युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपप्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले असून, लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Congress MLA Kalidas Kolambkar Shivsena Publicity Politics