Loksabha 2019 : काँग्रेस आघाडीला मुंबईत मनसेचा बूस्टर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 एप्रिल 2019

नांदेडमध्ये धडाडणार राज यांची तोफ
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा नांदेडला १२ एप्रिल रोजी होणार असल्याचे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून सांगण्यात आले. १२ ते १९ एप्रिल असा राज यांच्या प्रचार सभांचा पहिला टप्पा आहे. सोलापूर, इचलकरंजी, कऱ्हाड, खडकवासला, मावळ, बारामती येथेही त्यांच्या सभा होणार आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस आघाडीसाठी आशादायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मनसेच्या मतांचा बूस्टर काँग्रेस उमेदवारांना मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असतानाच उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील एकनाथ गायकवाड राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मनसेच्या उमेदवारांनी २००९ आणि २०१४ सार्वत्रिक निवडणुकीत लाखांच्या आसपास मते मिळविली होती. यंदाची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले असून, भाजप सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या भूमिकेचा कुणालाही लाभ झाला तरी चालेल, मात्र मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे राज यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना होणार असल्याची चर्चा आहे.

या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील काँग्रेस आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यासाठी काही उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार राज यांच्या भेटीला जाणार आहेत. राज यांचे निवासस्थान आणि राज ठाकरे, तसेच त्यांचे कुटुंबीय या मतदारसंघातील मतदार आहेत. त्यामुळे प्रचाराचा भाग म्हणून गायकवाड त्यांच्याकडे जाणार आहेत. उत्तर मुंबई मतदारांघातील उमेदवार ऊर्मिला मातोंडकर राज यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. मातोंडकर राजकारणात उतरण्याच्या आधीपासून त्यांची राज ठाकरे यांच्यासोबत ओळख आहे, हेच कारण या भेटीमागे असेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Loksabha Election 2019 Congress NCP Aghadi MNS Mumbai Politics