दक्षिण मध्य मुंबई की ईशान्य मुंबई; आठवले यांच्यापुढे पर्याय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

  • शिवसेना-भाजप यांच्या युतीसाठी आठवले हे प्रयत्नशील होते. जागा वाटपामध्ये एकही जागा न सोडल्यामुळे मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला वाऱ्यावर सोडल्याबद्दल आठवले यांनी नाराज व्यक्त केली आहे.
  • आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे समजते. मात्र महायुतीतून लढण्याचा आठवले यांचा विचार असून स्वतंत्र लढण्याचा नसल्याचे समजते.

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छूक असून त्यांनी या मतदार संघात गेल्या काही महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र ही जागा शिवसेनेला सोडल्यास ईशान्य मुंबईचा पर्याय आठवले यांच्यासमोर असेल अशी चर्चा आठवले यांच्या पक्षात सुरू आहे. 

शिवसेना-भाजप यांच्या युतीसाठी आठवले हे प्रयत्नशील होते. जागा वाटपामध्ये एकही जागा न सोडल्यामुळे मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला वाऱ्यावर सोडल्याबद्दल आठवले यांनी नाराज व्यक्त केली आहे. गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला सातारा लोकसभेची जागा सोडली होती. यावेळी लोकसभा निवडणूकीत दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढविण्यास आठवले इच्छूक आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या मतदार संघात विविध सभा, बैठका आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेवून निवडणुकीचा प्रचारच केला आहे. शिवसेना भाजप यांच्यात युती झाल्याने ही जागा शिवसेनेला सोडली जाण्याची दाट शक्‍यता आहे. येथून शिवसेनेचे राहूल शेवाळे हे खासदार म्हणून गेल्या निवडणूकीत निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. आताही शेवाळे विरूध्द गायकवाड असाच सामना रंगण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेला ही जागा सोडल्यास आठवले ईशान्य मुंबईचा पर्याय निवडण्याची शक्‍यता आहे. 

युतीत मित्रपक्ष म्हणून सहभागी झालेला आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे समजते. मात्र महायुतीतून लढण्याचा आठवले यांचा विचार असून स्वतंत्र लढण्याचा नसल्याचे समजते. दक्षिण मध्य मुंबईतून शेवाळे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता असून आठवले यांची अडचण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आठवले यांच्यासमोर ईशान्य मुंबईचा पर्याय असल्याचे समजते.

Web Title: Loksabha Election 2019 South Central Mumbai or Northeast Mumbai The alternatives next to Ramdas Athavale