Loksabha 2019 : तूर्त तरी ॲडव्हान्टेज युती...

जयवंत चव्हाण
गुरुवार, 28 मार्च 2019

शेट्टींविरोधात सापडेना उमेदवार
गुजरातीबहुल उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी हे तगडे उमेदवार आहेत. काँग्रेसला तेथे अजून उमेदवार सापडलेला नाही. सध्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा येथे आहे. मात्र शेट्टींनी प्रचाराला वेगाने सुरवात केली आहे. ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांचा भांडुप परिसरात प्रभाव आहे. शिवाजीनगर भागातील मुस्लिमांचाही त्यांना पाठिंबा मिळतोय. पण युतीच्या उमेदवाराबाबत उत्सुकता आहे. किरीट सोमय्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेना मदत करणार नाही, अशी भूमिका असल्यामुळेच युतीला उमेदवारी जाहीर करण्यात विलंब होत आहे. सध्या तरी संजय दिना पाटील यांना प्रतिस्पर्ध्याची प्रतीक्षा आहे.

शिवसेना-भाजप युतीने मुंबईत जुन्याच चेहऱ्यांना पसंती दिली आहे, तर आघाडीला अद्याप वायव्य, ईशान्य मतदारसंघांत उमेदवार मिळालेला नाही. मात्र, युतीचे अन्य सर्व उमेदवार तुलनेने बलवंत असल्यामुळे ही निवडणूक विरोधकांसाठी पुन्हा एकदा परीक्षा पाहणारीच ठरेल.

आघाडीचे मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना सामोरे जाणार आहेत. देवरा यांची प्रतिमा स्वच्छ असली तरी, त्यांची सारी भिस्त मुस्लिम आणि उत्तर भारतीय उमेदवारावर जास्त आहे. तिथे वंचित बहुजन आघाडीची भूमिका कळीची ठरणार आहे. ‘एमआयएम’ने मुस्लिम उमेदवार दिल्यास तो आघाडीची मते कमी करू शकतो. अशीच स्थिती उत्तर मध्य मतदारसंघात आहे. काँग्रेसच्या प्रिया दत्त या आधी निवडणुकीपासून दूर होत्या. मात्र, त्या अचानक निवडणुकीच्या मंचावर आल्यामुळे त्या पूनम महाजन यांना कितपत तोंड देतात, याबाबत उत्सुकता आहे. पूनम महाजन यांच्याविषयी नाराजीचा फायदा त्यांना मिळण्याची शक्‍यता आहे, परंतु तिथेही वंचित बहुजन आघाडी त्यांना त्रासदायक ठरू शकते.

दक्षिण मध्य मुंबईत एकनाथ गायकवाड यांचा धारावी परिसरावर भर असला तरी शिवसेनेचे राहुल शेवाळे यांचा मतदारसंघावर प्रभाव आहे. येथेही वंचित आघाडीचा उमेदवार गायकवाड यांना काही प्रमाणात फटका देऊ शकतो, असे सांगितले जाते. मात्र मुस्लिम-दलित मतदारांतील ‘स्ट्रॅटेजिक’ मतदानाची परंपरा पाहता गायकवाड यांना वंचित बहुजन आघाडीची फारशी काळजी करण्याचे कारण नाही. असे असले तरी राहुल शेवाळे यांचे पारडे जड राहणार असेच तेथील सध्याचे चित्र आहे. अशीच स्थिती आहे उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई मतदारसंघात. उत्तर मध्य मुंबईत गजानन कीर्तिकर यांच्याविषयी मतदारांमध्ये सहानुभूती आहे. तिथे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता उत्तर भारतीयांच्या मतांचा कीर्तिकर यांचा टक्का किती कमी होणार याची चर्चा आहे.    
 
मनभेदाचे दर्शन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर झालेल्या युतीचा निर्णय शिवसैनिकांनी मनापासून स्वीकारलेला दिसत नाही. भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांचे मनभेद काही भागात मतदानावर परिणाम करणारे ठरतील. विशेषतः ईशान्य मुंबईत त्याचा प्रभाव दिसेल. ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदीविरोधाची भूमिका घेतली आहे. मात्र २००९ च्या निवडणुकीत युतीला तडाखा देणारी मनसे २०१४ पासून निवडणुकीच्या राजकारणात शून्यवत झालेली आहे. त्यामुळे मुंबईतील कोणत्याही मतदारसंघात त्यांचा प्रभाव पडेल, असे सध्या तरी दिसत नाही.

गेमचेंजर योजना
या सगळ्यात काँग्रेससाठी दिलासादायक बाब एकच आहे. राहुल गांधी यांनी मुंबईतील झोपडीवासीयांना दाखवलेले ५०० चौरस फुटांच्या ‘वन बीएचके’चे स्वप्न आणि नुकतीच त्यांनी मांडलेली किमान उत्पन्न हमीची योजना. ही नवी योजना कशी जुमला आहे, हे जीव तोडून काही भाजप नेते सांगत आहेत आणि अर्थमंत्री अरुण जेटली, ’आम्ही तर आधीच याहून अधिक पैसे गरिबांना देत आहोत’, असे सांगत आहेत. यातील विरोधाभासही त्यांच्या लक्षात येत नाही. पण या सगळ्यातून या योजनेची संभाव्य परिणामकारकता लक्षात यावी. ही योजना गेमचेंजर ठरू शकते. अट एकच. काँग्रेसला ती तेवढ्या परिणामकारकतेने लोकांसमोर नेता आली पाहिजे. पण एकमेकांच्या तंगड्या ओढण्यातच काँग्रेसला रस असल्याने लोकांकडे धावणार कोण? त्यामुळे एकंदर सध्या मुंबईत ‘अडव्हान्टेज युती’ असेच वातावरण दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Yuti Gopal Shetty Politics Shivsena BJP