Loksabha 2019 : युतीत पुन्हा माशी शिंकली!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

कोणत्या तोंडाने मतदारांकडे जायचे?
'पावत्यांवर आमच्या नेत्यांची छायाचित्रे नाहीत. त्यामुळे आमचा कार्यकर्ता कोणत्या तोंडाने मतदारांपर्यंत या पावत्या पोहाेचण्यासाठी जाईल’, असा संतप्त सवाल शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत.

मुंबई - उत्तर मुंबई मतदारसंघात मतदारांना वाटण्यात आलेल्या मतपावत्यांवर केवळ भाजपच्या नेत्यांची छायाचित्रे दिसत असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या पावत्या न वाटण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानासाठी अवघा आठवडा शिल्लक असताना युतीतील हा नवा वाद काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो.

उत्तर मुंबई मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी मतदारांना मतपावत्या पाठवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या शाखांमध्येही या पावत्या पाठवण्यात आल्या; मात्र या पावत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोपाळ शेट्टी यांचे छायाचित्र आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे किंवा एकाही शिवसेनेच्या नेत्याचे छायाचित्र नसल्याने शिवसेना कार्यकर्ते संतापले आहेत. त्यांनी या पावत्याच मतदारांना न वाटण्याचा निर्णय घेतला आहे. 

यापूर्वी उत्तर-मध्य मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी त्यांच्या बॅनरवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र छापले नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून प्रचारात सहभागी न होण्याचा इशारा दिला होता. महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या वादावर पडदा टाकला होता; मात्र आता मतदानाला अवघा आठवडा शिल्लक असताना शेट्टी यांच्या पावत्यांमुळे शिवसेनेत नाराजीचे सूर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Yuti Shivsena BJP Voter Slip Leader Photo Politics