Election Results : लाव रे ते फटाके अन् वाजव रे ढोल!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

देशात भाजपप्रणीत आघाडीच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट होताच भाजप-शिवसेना नेत्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची खिल्ली उडविण्यास सुरवात केली. ‘लाव रे ते फटाके’, ‘वाजव रे ढोल’ अशी पोस्टर लावण्यात आली. युतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर करीत फटाक्‍यांची आतषबाजी केली.

मुंबई - देशात भाजपप्रणीत आघाडीच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट होताच भाजप-शिवसेना नेत्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची खिल्ली उडविण्यास सुरवात केली. ‘लाव रे ते फटाके’, ‘वाजव रे ढोल’ अशी पोस्टर लावण्यात आली. युतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर करीत फटाक्‍यांची आतषबाजी केली. 

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘लाव रे फटाके’, ‘वाजव रे ढोल’ असे लिहिलेली पोस्टर लावली. शिवसेना कार्यकर्त्यांनी दादर येथील शिवसेना भवनासमोर ढोल पथकांना बोलावून राज ठाकरे यांची खिल्ली उडवीत जल्लोष केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी मुंबई-पुण्यासह राज्यात दहा ठिकाणी सभा घेऊन भाजप-शिवसेना युतीवर कडाडून टीका केली होती.

त्यांनी भाषणादरम्यान ‘लाव रे तो व्हिडिओ,’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी राज ठाकरे यांच्या सभा आणि ‘लाव रे तो व्हिडिओ’ मोहीम फोल ठरवली आहे. त्यांनी सभा घेतलेल्या दहापैकी आठ मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांनीच बाजी मारली. या पार्श्‍वभूमीवर शिवाजी पार्क परिसर आणि शिवसेना भवनासमोर ‘वाजव रे ढोल’ आणि ‘लाव रे फटाके’ असा जल्लोष करीत शिवसेना कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Results Video Crackers Comment Shivsena BJP Leader Politics