Loksabha 2019 : मनसेचा निरुपम विरोध शिवसेनेच्या पथ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

वायव्य मुंबईत मराठी भाषक मतांचे एकत्रीकरण झाल्यास ते शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या फायद्याचे ठरण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : नरेंद्र मोदी व भाजपच्या पराभवासाठी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याची मनसेने तयारी दर्शवली आहे. परंतु, वायव्य मुंबईत मराठी भाषक मतांचे एकत्रीकरण झाल्यास ते शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या फायद्याचे ठरण्याची शक्‍यता आहे. कट्टर मनसेविरोधक संजय निरुपम येथील कॉंग्रेस उमेदवार असल्याने ही शक्‍यता बळावली आहे. 

निरुपम हे मनसेच्या परप्रांतीयविरोधी धोरणाचे कडवे विरोधक आहेत. त्यामुळे त्यांना मते न देता "नोटा'ला मते द्यावीत, असे आवाहन मनसेच्या नेत्यांनी सुरुवातीलाच केले होते. निरुपम पराभूत व्हावेत हीच कट्टर मनसे कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अशा स्थितीत शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्यांची सहानुभूती कीर्तिकर यांना मिळण्याची शक्‍यता आहे. 

मनसेने जरी कॉंग्रेसला पाठिंबा दिला, तरी मुंबईत मनसेची सर्व मते त्यांच्या उमेदवाराला मिळतील, असा त्याचा सरळधोपट अर्थ नाही. भाजपचा उमेदवार बिगरमराठी आहे का, कॉंग्रेसचा उमेदवार जैनांची मते मिळवण्यासाठी मराठीवादी पक्षांच्या मांसाहाराचा उल्लेख करतो का? (दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा यांनी असा उल्लेख केल्याची तक्रार शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे), कॉंग्रेसचा उमेदवार मराठी भाषक आहे का? आदी अनेक मुद्द्यांवर मनसेची मराठी भाषिक मते कोठे जातील ते ठरेल. एकंदरीत येथील गणित एक अधिक एक बरोबर दोन, असे वाटते तेवढे सोपे नाही. 

मुंबईतील सहा कॉंग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांपैकी निरुपम यांच्यावरच मनसेचा सर्वांत जास्त रोष आहे. मनसेच्या परप्रांतीयविरोधी धोरणाला निरुपम यांनी कसोशीने विरोध केला. त्याची परतफेड मनसे येथे करण्याची शक्‍यता आहे. 2014 मध्ये येथे मनसेला 50 हजार मते मिळाली होती. त्यामुळे कीर्तिकर यांनी प्रचारात मनसेच्या मतदारांना याची जाणीव करून दिली, तर त्यांना या मतांचा बोनस मिळू शकतो. 

"स्थानीय'ची कामे जमेची बाजू 
इतकी वर्षे मनसेचा रोख कॉंग्रेसच्या मराठीविरोधी धोरणावर होता. त्यातून तयार झालेला त्यांचा मतदार आता अचानक कॉंग्रेसला पाठिंबा देईल का, हा चर्चेचा मुद्दा आहे. त्यातच सरकारी आस्थापनांमधील मराठी टक्का वाढवण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समितीमार्फत केलेली कामे या जमेच्या बाजूचीही गजानन कीर्तिकरांना मदत मिळू शकते. 
 

Web Title: MNS against Sanjay Nirupam but advantage of Shivsena