Loksabha 2019: 'चौकीदार चोर है'पेक्षा ‘लाव रे तो व्हिडिओ’ची दहशत

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

- 'चौकीदार चोर है'पेक्षा  'लाव रे तो व्हिडिओ' या वाक्याची दहशत
- राज यांच्या व्हिडिओचा धसका विरोधकांनी घेतल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे
- लाव रे तो व्हिडिओ’बद्दल सोशल नेटवर्किंगवर अनेक पोस्ट

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है'पेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ' या वाक्याची सध्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा आहे. राज यांनी काही दिवसापूर्वी त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुक लढणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, आपण पंतप्रधान मोदी आणि भाजपविरुद्ध प्रचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

नांदेड, सोलापूर आणि इचलकरंजी येथे राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. नांदेड येथील सभेपासूनच राज्यभरात राज यांच्या दौऱ्याची चर्चा रंगली आहे. पहिल्याच सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींची काही वर्षांपूर्वीची आणि आत्ताच्या विधानांचे व्हिडिओ दाखवून त्यांनी दिलेली आश्वासने किती फसवी आहेत यासंदर्भात भाषण केले. पुराव्यांसकट राज यांनी केलेले हे भाषण नेटकऱ्यांच्या पसंतीस पडले. त्यानंतरच्या सभांमध्येही त्यांनी व्हिडिओचा वापर केला. याच व्हिडिओचा धसका आता विरोधकांनी घेतल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

सभांमध्ये हे व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणताना दिसतात. नेटकऱ्यांनी आता याच ‘लाव रे तो व्हिडिओ’बद्दल सोशल नेटवर्किंगवर अनेक पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी राज यांच्या प्रचाराची ही स्टाइल आवडल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या व्हिडिओचा आता विरोधकांनी धसका घेतल्याचे मत मांड़ले आहे. ट्विटर तसेच फेसबुकवर ‘लाव रे तो व्हिडिओ’ नावाने अनेक पोस्ट करण्यात आल्या आहेत.

 

 

 

 

Web Title: Mns Chief Raj Thackeray Lav Re To Video Went Viral With Memes