Loksabha 2019 : चौकीदाराचे हात मजबूत करा - मोदी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 एप्रिल 2019

देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले.

मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते.

या वेळी मोदी यांनी काँग्रेस पक्षासह गांधी घराणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यासह महागठबंधन आदींवर जोरदार टीका केली; तसेच मध्यमवर्गाचे देशाच्या विकासात, प्रगतीत महत्त्वाचे योगदान आहे, याचा पाढा वाचला; तसेच मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ले, पोलिसांनी हे हल्ले परतवून लावताना घेतलेली मेहनत, मुंबईतील मध्यमवर्गीय याचा भाषणात उल्लेख केला. या सभेला मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी उपस्थित होते.

‘कसं काय मुंबई, सगळं काही ठीक आहे ना?’ असे बोलून नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरवात केली. ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत जेवढी सर्वेक्षणे झाली त्यात भाजप पूर्ण बहुमताने सरकार बनवणार असाच कल आहे. त्यामुळे भाजपसह एनडीएला तीनशे ते चारशे जागा मिळणार, अशी चर्चा सुरू असल्याने काँग्रेस पक्ष गोंधळला आहे.’’

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे मोदींनी कौतुक केले. मात्र, काँग्रेसने हुतात्म्यांचे स्मारक बांधले नाही, असे सांगून मोदी म्हणाले, ‘‘पोलिस दिवसरात्र मेहनत घेऊन देशाची, शहराची सुरक्षा करीत असतात. यामध्ये ३३ हजार पोलिसांना वीरमरण आले आहे. तरीही काँग्रेसने त्या हुतात्म्यांचे स्मारक बांधले नाही. मात्र आम्ही दिल्लीत जागतिक दर्जाचे स्मारक बांधले.’’

‘मी चौकीदार आहे,’ असा उल्लेख करून मोदी म्हणाले, ‘‘देशाची सुरक्षा करण्यात काँग्रेस असमर्थ आहे. २००८ चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव या देशातील आयपीएल स्पर्धा बाहेर खेळवली गेली. मात्र मोदी सत्तेवर आल्यानंतर या देशात या स्पर्धा होत आहेत. निवडणुकाही होत आहेत. शिवाय सर्व प्रकारचे उत्सवदेखील होत आहेत. देशात भीतीचे वातावरण नाही.’’

हिंदुत्वामुळे युती ः उद्धव ठाकरे
हिंदुत्व आणि समान विचारसरणीमुळे शिवसेना आणि भाजपची युती केल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले. ठाकरे यांनी आजच्या सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांची राज्यात एकत्र सभा झाली नसल्याचा मुद्या त्यांनी उपस्थित केला. जे लोक प्रचारासाठी एकत्र येऊ शकत नसतील, तर सरकार स्थापन करताना कसे येणार, असा सवाल त्यांनी केला. दोन्ही काँग्रेसमधील दुफळीमुळे राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक सोडून दिल्याचे ठाकरे म्हणाले. ५६ पक्षांची आघाडी सत्तेवर आली तर ते देशाचे वाटोळे करतील. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम रद करण्याचा समावेश आहे, आम्ही मात्र देश एकसंध ठेवण्यासाठी काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होते, आहेत आणि पुन्हा असतील, असेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी नमूद केले.

मुंबईसाठी केंद्राकडून भरीव मदत ः मुख्यमंत्री 
मुंबईतील विकासकामांसाठी आवश्‍यक असणाऱ्या परवानग्या आणि त्यासाठी भरीव आर्थिक मदत मोदी सरकारने राज्य सरकारला दिल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत मेट्रो, कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, वांद्रे-वर्सोवा सी-लिंक प्रकल्प केंद्राच्या मदतीने सुरू आहेत. मुंबईतील २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण असताना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेत २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
सध्याची निवडणूक जंगलातील असल्याची गोष्ट कुणीतरी सांगितली. यासाठी कोल्हे-लांडगे एकत्र आले आणि त्यांनी पोपटाला सोबत घेतले. मात्र यांना जंगलात सिंह आणि वाघदेखील आहेत ते त्यांना माहित नाही आणि वाघ-सिंह समोर आले तर कोल्हे लांडग्यांचे काय होईल, हे सर्वांना माहित असल्याची टीका फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचे नाव न घेता केली. देशाकडे कुणी बोट दाखवले तर त्यांना घरात घुसून मारणारे आमचे सरकार असून, तेच पुन्हा निवडून येईल, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्‍त केला.

- मोदी म्हणाले
- काँग्रेस महागाई कमी करण्यात अपयशी ठरले
- आयुष्यमान भारतच्या माध्यमातून जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न
-मध्यमवर्गावर कर लावले नाहीत, तर करदात्यांची संख्या वाढवली
-उद्धव ठाकरे हे माझे छोटे भाऊ आहेत.

सिंह आणि वाघ 
जंगलचा राजा कोण हे ठरविण्यासाठी कोल्हे, लांडगे, पोपट एकत्र आले. ते अंदाज व्यक्‍त करत असतानाच सिंह आणि वाघ एकत्र आले. हे दोघे एकत्र आल्यावर जंगलात राज्य कुणाचे, हा प्रश्‍न उरलाच नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगताच सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला. देशभक्‍तीचे काव्य फडणवीस यांनी सादर करताच सभेत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा सुरू झाल्या.

मॅक्‍झिमम कॉमन प्रोग्रॅम 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, विचारात समता नसलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात. ५६ जणांची महामिलावट हे त्याचेच उदाहरण आहे, असे सांगताना पंतप्रधानपदासाठी एकत्र यायचे अन मग ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’ असे गोंडस नाव द्यावयाचे. आमच्यात, भाजप-शिवसेनेत ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’ नाही, तर ‘मॅक्‍झिमम मिनिमम प्रोग्राम’ आहे, असे उद्धव यांनी घोषित केले. अयोध्येत राममंदिर उभे करणे ही आमची घोषणा आहे, असे त्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांचे कौतुक
नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘लोकप्रिय’ असा केला अन्‌ त्यांच्या भाषणानंतर लगेचच त्यांची पाठ थोपटली. उद्धव ठाकरे यांनीही आज तर मुख्यमंत्र्यांचे चौकारही सीमापार स्टेडियम बाहेर गेले असल्याचे कौतुकाने नमूद केले.

मी राहुलचा कॅच घेणार : आठवले
या सभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी जान आणली. ते म्हणाले, ‘‘मला पद नको, मंत्रिपद नको, भारताच्या भविष्यासाठी मी येथे आहे. आमची चमू उत्तम टीम आहे. देवेंद्र उत्तम बॉलर आहेत, उद्धव ठाकरे उत्तम बॅट्‌समन आहेत. मी उत्तम कॅच घेतो. मी राहुल गांधींचा कॅच घेणार आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी अन दलितांना आवाज देण्यासाठी मी महाआघाडीत आहे, असे आठवले यांनी घोषित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi was speaking at a rally in Bandra Mumbai for campaigning for Shiv Sena-BJP alliance candidates