कीर्तिकरांना आव्हान निरुपमांचे!

Northwest Mumbai
Northwest Mumbai

युतीमुळे शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांची खासदारकीची वाट पुन्हा मोकळी झाली आहे; मात्र अंतर्गत गटबाजी दूर झाली, तर काँग्रेसकडून युतीला जोरदार टक्कर दिली जाईल, असे मानले जाते. जनसंपर्क कमी झाल्याने कीर्तिकरांबाबत काही अंशी नाराजी आहे. मात्र वायव्य मुंबई मतदारसंघासाठी शिवसेनेकडे सध्यातरी अन्य उमेदवाराचा पर्याय दिसत नाही.

मुंबईच्या बदलत्या भाषक स्थितीचा फटका कीर्तिकर यांना २००९ च्या निवडणुकीत बसला; मात्र २०१४ मध्ये युती आणि ‘मोदी लाटे’मुळे त्यांनी या पराभवाचा वचपा काढला. २०१७ मधील मुंबई महापालिका निवडणुकीत युती फिस्कटली आणि भाजप-शिवसेना स्वबळावर लढले. त्या वेळी मतदारसंघातील तीन वॉर्डांत भाजपने शिवसेनेला १५ जागांवर अडवत २१ वॉर्डांत विजय मिळवला. कीर्तिकर वयाने ज्येष्ठ आहेत. त्यामुळे मतदारसंघातील त्यांचा जनसंपर्क कमी झाल्याने मतदारांमध्ये थोडीशी नाराजी आहे; मात्र ती दूर करणारी कार्यकर्त्यांची फळी त्यांच्याकडे आहे.

युतीची घोषणा झाली नसती, तर परिस्थिती खूपच बदलली असती. भाजपने शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले असते. कीर्तिकरांवर पक्षनेतृत्व नाराज असले, तरी राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू या दोन्ही आमदारांना दिल्लीत जाण्यात रस नसल्याने शिवसेनेसमोर सध्यातरी पर्याय नाही. पुत्र अमोल यांना कीर्तिकरांऐवजी उमेदवारी मिळण्याचीही शक्‍यता नाही.

काँग्रेसचीही या परिसरात ताकद आहे. इच्छा नसतानाही मिळालेल्या या मतदारसंघात गुरुदास कामत यांनी उत्तम पक्षबांधणी केली होती. त्यांच्या निधनानंतर संजय निरुपम, कृपाशंकर सिंह आदींच्या नजरा येथे वळल्या. पक्षांतर कुरबुरींमुळे येथे काँग्रेसला विजयासाठी झगडावे लागणार आहे.

२०१४ मधील मतविभाजन
    गजानन कीर्तिकर (शिवसेना) - ४,६४,८२० (विजयी)
    गुरुदास कामत (काँग्रेस) - २,८१,७९२ 
    महेश मांजरेकर (मनसे) - ६६,०८८ 
    मयंक गांधी (आप) - ५१,८६० 

मतदारसंघातील नाराजीची कारणे
    झोपडपट्ट्यांची अनियंत्रित वाढ 
    मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडीत भर 
    निवासी संकुलांच्या नोंदणीचा प्रश्‍न कायम 
    लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठ्यात कमतरता 
    भाजी मार्केट, मनोरंजन सभागृहे अत्यल्प 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com