Loksabha 2019 : ‘चायवाला’नंतर भारतीय राजकारणात ‘चौकीदाराचा’ जन्म

Loksabha 2019 : ‘चायवाला’नंतर भारतीय राजकारणात ‘चौकीदाराचा’ जन्म

मुंबई - ‘चायवाला’नंतर भारतीय राजकारणात आता नव्याने ‘चौकीदाराचा’ जन्म झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते गल्लीतील सामान्य कार्यकर्ता ही स्वत:ची ओळख चौकीदार म्हणून करून देत आहे; मात्र बंगला अथवा इतर अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असणारा चौकीदार मात्र खंगलेला आणि उपेक्षितच राहिला आहे. सलग ३६५ दिवस न थकता प्रत्येक दिवशी १२-१४ तास काम, महिन्याकाठी सहा ते आठ हजार पगार, आजारी पडले तरी दिवसाचा पगार कापला जाईल याची भीती, भटके कुत्रे, गर्दुल्ले, भुरटे चोर यामुळे वाढत जाणाऱ्या ताणाखाली देशातील खरा चौकीदार आपले जीवन कंठत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी असलेला चौकीदार कसे जीवन जगत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला. या वेळी खरा चौकीदार उपेक्षितच राहिल्याची खंत व्यक्‍त करण्यात आली.

अनेक चौकीदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपले मन मोकळे केले. नाव सांगितले तर नोकरी जाण्याची भीती होती. १२-१२ तास काम करूनही महिन्याकाठी फक्‍त सात हजार पगार हातात टेकवला जातो. काही ठिकाणी तर आठ तासांचे चार हजार रुपये दिले जातात. त्यामुळे दहिसरला १० बाय १० च्या झोपडीत भाड्याने घर घेऊन दिवस काढावे लागतात. भाड्यापोटी चार हजार रुपये मोजावे लागतात. मग राहिलेल्या दोनतीन हजारांत संसाराचा गाडा कसा हाकायचा, असे दहिसर येथील एका उद्यानाची चौकीदारी करणाऱ्या चौकीदाराने सांगितले.

घाटकोपर येथील चौकीदारालाही नोकरी जाण्याची भीती होती. त्यानेही नाव न सांगता मोकळे होण्यास सुरुवात केली. १२ तास रोजचे काम करावे लागते. त्यात आठवड्यातून एकही सुट्टी मिळत नाही. आजारी पडलो तरी पगार कापला जातो. एकदोन दिवसांची सुट्टी घेतली तरी ५०० रुपये कमी केले जातात. अनेक वेळा तर अंग तापाने फणफणत असतानाही कामावर यावे लागते. भुरटे चोर, गर्दुल्ल्यांचा अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो. ते टोळक्‍याने येतात, सुरक्षेसाठी एकटेच असतो, त्यामुळे अनेकदा मारही खावा लागला आहे, अशी खंत मानखुर्द येथील चौकीदाराने व्यक्‍त केली.

नोंदणीच्या तिप्पट कंपन्या
मुंबई आणि ठाण्यात सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या साधारण ११३ नोंदणीकृत कंपन्या आहेत; मात्र प्रत्यक्षात ही संख्या ५०० हून अधिक आहे असे जाणकार सांगतात. नोंदणी असलेल्या कंपन्यांना सर्व नियम पाळावे लागतात; मात्र नोंदणी नसलेल्या कंपन्यांची संख्या मोठी आहे. 

या कंपन्यांमध्ये खास करून बंद पडलेल्या कंपन्यांतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, गावावरून रोजगाराच्या शोधात आलेल्यांना चौकीदारांचा गणवेश देऊन उभे करतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत नाही.

किमान वेतन २३ हजार हवे
राज्य सरकारच्या सुरक्षारक्षकांना किमान मूळ वेतन, इतर भत्ते, लेव्ही मिळून महिन्याला २३ हजार २६६ रुपये मिळायला हवेत, असे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीचे अध्यक्ष उदय भट यांनी सांगितले. त्याचबरोबर दिवाळी, गणपती अशा सणांसाठी वर्षातून चार दिवस रजा, २१ भरपगारी रजा आणि आठवड्याला एक सुट्टी मिळायलाच हवी असे नियम आहेत; मात्र सर्वच ठिकाणी या नियमांना तिलांजली देत चौकीदारांना  राबवून घेण्यात येते.

बसल्या जागी १० ते १२ हजारांची कमाई
नोंदणी नसलेल्या सिक्‍युरिटी गार्डच्या कंपन्या लहान-मोठ्या सोसायट्यांना, कंपन्यांना सुरक्षा रक्षक पुरवतात. महिन्याला १५ ते २० हजारांत चौकीदार मिळत असल्याने अनेक इमारतींमध्ये याच चौकीदारांची नियुक्ती केली जाते. प्रत्यक्षात या चौकीदारांना अतिशय कमी पगार देऊन इमारतींच्या गेटवर उभे केले जाते. त्यामुळे राहिलेले अर्ध्यापेक्षा अधिक पैसे मिळवून देणारा हा व्यवसाय झाला आहे. अशा चौकीदाराला इमारतींमधील रहिवासी चौकीदार समजत नाहीत. पाण्याचा पंप बंद करण्यापासून अनेक कामे हे चौकीदार करतात. इमारतीत उभ्या असलेल्या गाड्या धुण्यासाठी, फेरीवाला आल्यावर भाजीपाला घेऊन ठेवणारा चौकीदार हा हक्काचा माणूस झाला आहे. गाड्या धुऊन महिन्याला एक ते दीड हजार रुपये मिळत असल्याने अनेक जण कुटुंबाला हातभार म्हणून हे काम करतात.

पोट भरण्यासाठी दोन कामे
मोदी सत्तेत आल्यापासून चौकीदाराची चर्चा होत आहे; मात्र आमची स्थिती वाईट आहे. दिवसभर राब राब राबावे लागते. वेळप्रसंगी जीवाची जोखीम पत्करावी लागते. दुसरा मार्ग नसल्याने नाइलाजाने काम करावे लागते. नोकरी सोडायचा विचार केला तर घरची परिस्थिती डोळ्यासमोर येते. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. आलेल्या व्यक्तींची मोबाईलवर नोंद ठेवावी लागते. त्याची नोंद पुन्हा रजिस्टरमध्ये करावी लागते, पार्किंग करून घेणे अशी कामे करावी लागतात. १२ तास ड्युटी करून आठ हजार पगार दिला जातो; मात्र त्यात प्राथमिक गरजाही पूर्ण होत नाहीत. मुलांची आबाळ होते. घरखर्च भागवण्यासाठी १२ तासांनंतर पुन्हा दुसरीकडे कुठे तरी काम करावे लागते, तेव्हाच घर चालते. सोबतीला सांभाळून घेणारा जोडीदार असल्याने आयुष्य चालू राहते; मात्र आयुष्यात फार काही हाती लागत नाही.
- प्रमोद कानडे, चौकीदार

नोकरीत पोट भरत नाही
४० वर्षे एका सोसायटीत चौकीदार म्हणून काम करत आहे. अवघा सहा हजार पगार हातात येतो. ड्युटी फिक्‍स नाही. काही वेळेस सलग २४ तास काम करावे लागते. तसा पगार मिळावा अशी अपेक्षा असते; मात्र तसे कधी आतापर्यंत झाले नाही. घरात कमी आणि नोकरीवरच जास्त वेळ थांबावे लागते. घरच्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व काही करावे लागते.
- शंकर कांबळे

चौकीदार नावाला सोन्याचे दिवस
चौकीदार नावाला फक्त सोन्याचे दिवस आले आहेत; मात्र खऱ्या चौकीदाराची स्थिती अतिशय वाईट आहे. आमच्या नशिबी १२-१३ तासांची ड्युटी आहे. वर्षभर चौकीदार फक्त नावापुरता असतो. चौकीदार आहे असे सांगितल्यावर लग्नाला मुलीही मिळत नाहीत. गावावरूनही लग्नासाठी नकार येतो. नोकरीसाठी कंपन्यांकडे नोंद करावी लागते. त्या नोंदीचेही पैसे घेतले जातात. प्रत्यक्षात अर्धा पगारच आमच्या हातात येतो. आमच्या पैशांची चर्चा होते; मात्र आमच्या परिस्थितीवर कोणीही बोलत नाही.
- जितू गावडे

आमची बदनामी होतेय...!
चौकीदार चोर है हा जो विरोधी पक्षांकडून प्रचार करण्यात येत आहे, त्याने आमची बदनामी होत आहे. आम्हाला सकाळी ८ ते रात्री ८ अशी रोजची नोकरी करावी लागते. महिन्याला फक्त सात हजार मिळतात. यात कुटुंबाचा खर्च भागत नाही. खऱ्या चौकीदाराचे आयुष्य किती खडतर आहे हे बाहेरून कळणार नाही. आमचा युनिफॉर्म घालून ऊन-पावसात उभे राहा, मग आमची स्थिती तुमच्या लक्षात येईल. मोदींनी चौकीदार असल्याचे सांगितले आहे. ते अनेक सभांमधून तसे बोलतात. आता त्यांनी आमच्यासाठी काहीतरी करावे अशी आमची इच्छा आहे.
- महादेव म्हस्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com