हिंदुत्व अन्‌ देशहितासाठीच युती - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मार्च 2019

नाशिक - शिवसेना-भाजपमध्ये पाच वर्षांत अनेक मुद्‌द्‌यांवर मतभेद झाले. लढायची तयारी दोन्ही पक्षांनी केली. शेतकरी कर्जमाफी, नाणारसह काही मुद्‌द्‌यांना मी विरोध केला; पण तो प्रामाणिक होता. आता हिंदुत्व व देशहित, या व्यापक विचारावर दोन्ही पक्षांनी प्रामाणिक युती केली आहे. युतीचा वृक्ष लावायला मोठा त्याग आहे. अनेकांनी रक्त सांडले आहे. लोकसभेवर भगवा फडकविण्यासाठी त्यामुळे गद्दारी, हरामखोरी चालणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

लोकसभा निवडणुकीतील युतीनंतर जिल्हास्तरावरील पदाधिकारी कार्यकर्त्यांमधील मनोमिलनासाठी आज चोपडा लॉन्समध्ये उत्तर महाराष्ट्रातील युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मनोमिलन मेळावा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, प्रा. राम शिंदे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्यमंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे नेते संजय राऊत व्यासपीठावर होते. ठाकरे म्हणाले, की पाच वर्षे आमच्यात मतभेद होते. "हम आपके है कोन?' अशी आमच्यात स्थिती होती. पण, आमची एका दिवसात युती झाली. उमेदवार जाहीर होऊन मेळावेदेखील सुरू झाले आहेत. सध्या कॉंग्रेस आघाडीत "हम आपके है कोन?' अशी स्थिती आहे. राम मंदिर, पाकिस्तानचे कंबरडे मोडा आणि शेवटी शेतकऱ्यांची कर्जमाफी, या मागण्या कायमच आहेत. हिंदुत्वाच्या व्यापक विचारावर आधारित युती आहे.

विरोधकांचे "महाठकबंधन' - फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की विरोधकांचे महागठबंधन नव्हे ते "महाठकबंधन' आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी त्यांची आघाडी आहे. आम्ही परस्परांशी लढलो असलो, तरी आमच्यात हिंदुत्व आमचा मुद्दा राहिला आहे. हिंदुत्व हाच देशाला जोडणारा महत्त्वाचा धागा आहे. युती झाल्याने विरोधकांच्या चेहऱ्यावर पाणी राहिलेले नाही. अनेकांनी माघार घेतली आहे. आमची युती मजबूत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuti for Hindutva and Countrywide Uddhav Thackeray Politics