Loksabha 2019 : सुवेंद्र गांधी यांची 'नगर'मध्ये बंडखोरी; अपक्ष लढणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 मार्च 2019

मी देतो 50 लाख! 
गोकुळ खराटे नावाचे कार्यकर्ते खासदार गांधी यांना म्हणाले, ""साहेब, तुम्ही फक्त उभे राहा. पैशांची चिंता करू नका. मी एका रात्रीत पन्नास लाख रुपये उभे करून देतो. आपल्या अंगातील कपड्यांवर जाऊ नका!'' 

नगर : भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा आज येथे केली. दुसरीकडे, "आपण त्यांची समजूत काढू,' असे खासदार गांधी यांनी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

खासदार गांधी यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने, नाराज झालेल्या समर्थकांचा मेळावा आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झाला. त्यात सुवेंद्र यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली. मेळाव्यानंतर पत्रकांशी बोलताना सुवेंद्र म्हणाले,

"कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढविणार आहे. मी वडिलांचे ऐकणारा मुलगा आहे. त्यांचे आशीर्वाद घेणारच आहे. जनतेला सहज उपलब्ध होणारा खासदार हवा आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवाराची भेट घेणे सामान्यांना सहज शक्‍य असणार नाही. माझी उमेदवारी हा दबावतंत्राचा प्रकार नाही.'' 

यावर खासदार गांधी म्हणाले, ""मी सुवेंद्रचे मन वळविण्याचा प्रयत्न करीन. मुलगा माझे ऐकेल, अशी मला खात्री आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा हा परिपाक आहे. त्याच्या भूमिकेला माझा पाठिंबा नाही. मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा उद्यापासून प्रचार करीन.'' 

दरम्यान, या मेळाव्यात खासदार गांधी यांच्या समर्थकांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. खासदार गांधी यांच्या विजयाच्या घोषणा देत, अन्य पक्षात जाऊन निवडणूक लढविण्याचा आग्रह त्यांना केला. विखे घराण्यावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. 

शेवटी दिलीप गांधी यांनी मवाळ भूमिका घेत, आपण पक्ष सोडणार नसल्याचे जाहीर केले व चार तास चाललेल्या संतप्त भाषणांवर पडदा टाकला. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी नंतर, हा मेळाव्याचा अट्टहास कशासाठी केला, असा प्रश्‍न उपस्थित केला. 

मेळाव्यात भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष सुनील रामदासी, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, ऍड. बापूसाहेब चव्हाण, ऍड. राहुल झावरे, केंदळचे सरपंच अरुण डोंगरे, आढळगावचे सरपंच देवराव वाकडे, कासम शेख, संजय पाटील, विश्‍वनाथ राऊत, माऊली धारवाडकर, साईदीप अग्रवाल, दिनेश लवाट, अशोक कटारिया, बाळासाहेब पोटघन, शांतिलाल कोपनर, जगन्नाथ घुगे, आबा पुरोहित आदींची भाषणे झाली. 

मी देतो 50 लाख! 
गोकुळ खराटे नावाचे कार्यकर्ते खासदार गांधी यांना म्हणाले, ""साहेब, तुम्ही फक्त उभे राहा. पैशांची चिंता करू नका. मी एका रात्रीत पन्नास लाख रुपये उभे करून देतो. आपल्या अंगातील कपड्यांवर जाऊ नका!'' 

Web Title: BJP MP dilip gandhi son in amednagar Independent nomination