साताऱ्यात भाजपला अजूनही हवेत राजे!

साताऱ्यात भाजपला अजूनही हवेत राजे!

सातारा - शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर सातारा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे सांगण्यात येत आहे; पण अद्यापही भाजपच्या नेत्यांनी या मतदारसंघावर आपलाच दावा ठेवला आहे. त्यासाठी त्यांनी उदयनराजेंना भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. येत्या २४ तारखेला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या रायगडावरील कार्यक्रमाला उदयनराजेंना निमंत्रण दिले आहे. यामध्ये त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न होणार आहे. 

राष्ट्रवादीतून खासदार उदयनराजे भोसले यांचे सातारा लोकसभेसाठी नाव निश्‍चित झालेले असतानाच आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध दर्शविला आहे. हा विरोध शरद पवारांपर्यंत गेला आहे, तरीही खासदार उदयनराजेंनी मी तिकिटाची काळजी करत नाही, माझ्याकडे अनेक तिकिटे आहेत, असे सांगून या विरोधाला जुमानलेले नाही. राष्ट्रवादीतून विरोध होऊ लागल्याने पहिल्यापासून उदयनराजेंच्या भूमिकेची वाट पाहात बसलेल्या भाजपच्या नेत्यांनी आता उदयनराजेंना भाजपमध्ये घेण्यासाठी ताकद लावण्यास सुरवात केली आहे. त्यातच सेना-भाजपची युती झाल्याने सातारा मतदारसंघ सेनेच्या वाटणीला गेल्याचे सांगण्यात आले आहे; पण अद्यापही भाजपच्या नेत्यांचा सातारा मतदारसंघावर दावा कायम आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांत मतदारसंघाची यादी अंतिम करताना सातारा भाजपकडे कसा येईल, यासाठी जोराचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ताकद लावली आहे. येत्या २४ तारखेला खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. याच दिवशी रायगडावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेच्या समारोपाचा कार्यक्रम असून, हा कार्यक्रम संभाजी भिडे गुरुजींच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व मंत्र्यांना निमंत्रण दिले गेले आहे. त्यासोबतच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही निमंत्रण आहे. या कार्यक्रमात उदयनराजेंना भाजपमध्ये येण्यासाठी गळ घातली जाणार आहे. या गळीला उदयनराजे कितपत दाद देतात यावर सर्व काही अवलंबून आहे. मुळात सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचे तिकीट असल्याशिवाय निवडून येता येणार नाही. हे त्यांनी यापूर्वीच ओळखले आहे. किमान राष्ट्रवादीला ऐन वेळी दुसरा उमेदवार देणे ही सोपे नाही. अशा परिस्थितीतही भाजपने मात्र, उदयनराजेंसाठी आपले प्रयत्न अखेरपर्यंत सुरूच ठेवण्याची भूमिका घेतल्याचे यातून दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com