Loksabha 2019 : हाकलपट्टी केलेले 'ते' नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत 

विठ्ठल लांडगे
सोमवार, 25 मार्च 2019

'या' नगरसेवकांवर कारवाई अटळ असल्याचे वृत्त 'सकाळ'नेच त्यावेळी दिले होते. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ नये, वेळ पडल्यास विरोधात बसावे, अशी सूचना स्वतः पवार यांनी केली होती.

नगर : महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या 'राष्ट्रवादी'च्या 18 नगरसेवकांसह शहर-जिल्हाध्यक्षांवरील कारवाई आज मागे घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. 

आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची मोर्चेबांधणी करण्यासाठी पवार आज नगरमध्ये मुक्कामी आले आहेत. सायंकाळी उशिरा झालेल्या व्यापारी व उद्योजकांच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी 12 जानेवारीस या नगरसेवकांवर कारवाई केली होती. 'या' नगरसेवकांवर कारवाई अटळ असल्याचे वृत्त 'सकाळ'नेच त्यावेळी दिले होते. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ नये, वेळ पडल्यास विरोधात बसावे, अशी सूचना स्वतः पवार यांनी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत आमदार संग्राम जगताप व नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. ही बाब त्यावेळी पवार यांनाही रुचली नव्हती. 

त्यानंतर पक्षातर्फे शहर -जिल्हाध्यक्ष व 18 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नगरसेवक व जिल्हाध्यक्षांनी त्यावर खुलासाही पाठविला मात्र, खुलासा न केल्याबद्दल हकालपट्टी करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे, हा निर्णय सर्वश्री माझा असल्याचे आमदार जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेही होते. 

'राष्ट्रवादी'चे नगरसेवक...! 
सागर बोरुडे, मीना चव्हाण, दीपाली बारस्कर, संपत बारस्कर, विनीत पाऊलबुधे, कुमार वाकळे, समद खान, ज्योती गाडे, शोभा बोरकर, प्रकाश भागानगरे, शीतल जगताप, गणेश भोसले, अविनाश घुले, परवीन कुरेशी, नजीर शेख, रूपाली पारगे, मीना चोपडा, सुनील त्रिंबके.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याच विचारानुसार आजवर काम केले. मात्र, महानगरपालिका पदाधिकारी निवडणुकीत नाईलाजाने तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला. साहेबांनी आमची अडचण समजून घेत आम्हाला पुन्हा संधी दिली. त्याबद्दल धन्यवाद. आता पुन्हा रात्रंदिवस एक करुन नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना निवडून आणू. 
- विनित पाऊलबुधे, ज्येष्ठ नगरसेवक, राष्ट्रवादी  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corporators are again join NCP