Loksabha 2019 : मानापमानाच्या नाट्यात पदाधिकाऱ्याचा बळी! 

परशुराम कोकणे 
बुधवार, 10 एप्रिल 2019

  • युवा सेनेत मानपानाचे नाट्यमय राजकारण
  • बदनामी केल्याने भवर बंधूची हकालपट्टी 
  • लेखी तक्रार न देता सोशल मि़डीयावर केले होते आरोप

लोकसभा 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींच्या प्रचाराच्या कारणावरून मानापमानाचे नाट्य चांगलेच रंगले आहे. या नाट्यातून युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब भवर व त्यांचे अतुल भवर यांची युवा सेनेतून हकालपट्टी करून बळी देण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यात लक्ष न घातल्यास हा वाद वाढण्याची शक्‍यता आहे. 

महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना पाठिंबा दिल्यानंतर युवा सेनेकडून भवर यांना जाब विचारण्यात आला. याच कारणावरून युवा सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर आरोप करताना अर्वाच्च भाषेत संवाद साधल्याने बाबासाहेब भवर, त्यांचे भाऊ अतुल भवर या दोघांची युवा सेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. याबाबत भवर यांना अद्याप लेखी कळविण्यात आले नसल्याचे समजते. 

युवा सेनेतील या नाट्यविषयी बोलताना जिल्हाप्रमुख मनीष काळजे म्हणाले, 'भवर यांनी आपले म्हणणे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी कळवायला हवे होते. सोशल मीडीयावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. याच कारणारून संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी भवर बंधूंची युवा सेनेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.' 

'गटातटाच्या राजकारणामुळे संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी कारवाई केली जरी असली तरी हकालपट्टीची भुमिका ही अधिकृत नाही. आम्हाला विश्वासात न घेता परस्पर कारवाई केली गेली आहे, याचे आम्ही समर्थन करीत नाही. संपर्क प्रमुखांना हकालपट्टीची कारवाई करता येत नाही. आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेचे कार्य करीत राहणार, शिवसेना वाढविणार. मातोश्रीवर जाऊन आम्ही आमची भुमिका मांडणार आहोत,' असे श्री. भवर यांनी सांगितले. 

आम्ही काँग्रेसला मॅनेज असल्याचे पुरावे भवर यांना देता आले नाहीत. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप, पक्षाची बदनामी यामुळे भवर बंधूंची पक्षातून हकालपट्टी करत असल्याचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी माध्यमांना सांगितले आहे. 
- मनीष काळजे, जिल्हाप्रमुख, युवासेना 

पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवून हकालपट्टी करणारेच पक्षाच्या विरोधात वागतात. युतीचा प्रचार न करता विरोधी पक्षाचा प्रचार करणाऱ्यांवर आम्ही कारवाईची मागणी केली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिवसैनिकांवर जर असे दिवस येत असतील तर भविष्यात शिवसेना कशी वाढणार. 
- बाबासाहेब भवर, उपजिल्हाप्रमुख, युवा सेना

Web Title: Due to politics in the yuva sena a worker was expelled from the party