शेट्टींविरोधात उल्हास पाटील की धैर्यशील माने ?

शेट्टींविरोधात उल्हास पाटील की धैर्यशील माने ?

जयसिंगपूर - महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष-शिवसेनेने उमेदवारीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांची हॅट्‌ट्रीक रोखण्यासाठी पडद्यामागच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. युतीकडून अद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे खासदार शेट्टी यांच्याविरोधात कोण, याबाबत आडाखे बांधले जात आहेत.

गतवेळी ज्यांनी शेट्टींचा प्रचार केला त्याच मंडळींनी आता त्यांना रोखण्याचा विडा उचलला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने किंवा आमदार उल्हास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यापैकी एक जण शेट्टींविरोधात शड्डू ठोकू शकतो.

शिरोळ, हातकणंगले व शाहूवाडी मतदारसंघात भगवा झेंडा फडकत असून, शिराळा आणि इचलकरंजी मतदारसंघावर भाजपची पकड आहे. ऊस दराच्या आंदोलनातून राजू शेट्टी यांनी आमदारकी व खासदारकी काबीज केली.  ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची त्यांनी धूळधाण केली, त्याच काँग्रेसबरोबर त्यांचे राजकीय सूत जुळले आहेत. यावर्षी एकरकमी ‘एफआरपी’च्या आंदोलनात संघटना आणि कारखानदार सरकारविरोधीत लाटेत सामील झाले. दोन महिन्यांवर निवडणूक येऊन ठेपली असताना शेट्टींविरोधात उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

धैर्यशील माने यांच्याकडूनही मतदारांशी संपर्क सुरू आहे. आजोबा माजी खासदार बाळासाहेब माने, आई माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्यानंतर तिसरी पिढी खासदारकीतून पुढे येण्यास उत्सुक आहे. दुसरीकडे गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत खासदार शेट्टी यांच्या होमपिचवर ‘स्वाभिमानी’चेच खंदे समर्थक असणाऱ्या उल्हास पाटील यांनी उमेदवारी डावलल्याने हातात भगवा घेत स्वाभिमानीचे पानिपत केले. त्याच उल्हास पाटील यांना शेट्टींविरोधात उभे करण्याच्याही हालचाली सुरू आहेत. 

यावेळची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर लढविणार आहे. पुढील विरोधक कोण याची चिंता नाही. कारण शेतकरी आपल्याबरोबर. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरच लढलो. यापुढेही लढू.
- राजू शेट्टी,
खासदार

आपली उमेदवारी निश्‍चित आहे. मतदारसंघाचा दौरा सुरू आहे. मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. माने घराण्यातील तिसरी पिढी खासदारकीच्या माध्यमातून लोकसेवेत येणार. 
- धैर्यशील माने
, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झाला नाही. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश मानूनच कार्यरत राहू. 
- उल्हास पाटील,
आमदार

दृष्टिक्षेपात ‘हातकणंगले’
 मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला
 शिवसेनेची अधिकृत उमेदवारी गुलदस्त्यात
 एकूण गावे- ६२९ व ८६० बूथ
 एकूण मतदार- १७,६८,५३८

‘फ्लॅशबॅक २०१४’

  •  राजू शेट्टी, स्वाभिमानी    ६,४०,४२८
  •  कल्लाप्पाण्णा आवाडे, काँग्रेस    ४,६२,६१८
  •  सुरेश पाटील, अपक्ष    २५,६४८
  •  चंद्रकांत कांबळे, बसप    ११,४९९
  •  रघुनाथ पाटील, आप    ९०१५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com