'महाडिकांना सोडता येईना अन्‌ मंडलिकही नकोत

 'महाडिकांना सोडता येईना अन्‌ मंडलिकही नकोत

महापालिकेतील भाजप-ताराराणी आघाडीच्या राजकारणाचे संदर्भ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बदलणार आहेत. पक्ष सोडून अन्य कोणत्याही उमेदवाराच्या व्यासपीठावर जाऊ नका, असे आदेश भाजपने दिल्याने भाजप नगरसेवकांना खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारात उतरणे अडचणीचे ठरणार आहे. इकडे महाडिकांना सोडता येत नाही आणि तिकडे संजय मंडलिकही नकोत, अशा मानसिकतेत नगरसेवक सापडले आहेत.

गेली साडेतीन वर्षे महापालिकेच्या राजकारणात भाजप-ताराराणी आघाडी एकसंध राहिली. महापौरपदापासून अनेक निवडींना आघाडीला सामोरे जावे लागले. पुरेशा संख्याबळाअभावी आघाडी सत्तेपर्यंत पोहचू शकली नाही तरी सर्व निवडीत सदस्य आघाडीशी प्रामाणिक राहिले. ऑक्‍टोबर २०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे १३ सदस्य निवडून आले. ताराराणी आघाडी महाडिकप्रणित आघाडी आहे. दोघांनीही आघाडी म्हणूनच निवडणूक लढविली. ताराराणी आघाडीला १९ जागा मिळाल्या. या आघाडीचे मूळचे सदस्य काँग्रेस, राष्ट्रवादीचे होते. काँग्रेसला फारसा फटका बसला नाही; मात्र ताराराणी आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि महाडिक यांचा काडीमात्र संबंध आला नाही. लोकसभा निवडणुकीत युती झाल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. यातून नगरसेवकांचीही सुटका नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. मंडलिकांचा प्रचार कसा करायचा, असा प्रश्‍न १३ नगरसेवकांना पडला आहे. पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे कार्यवाही करू, असे सांगितले जात असले तरी खासदार महाडिक यांच्याशी असलेल्या वैयक्तिक स्तरावरील संबंधामुळे थेट भूमिका घेणे अडचणीचे ठरले आहे.

महापौरांसह राष्ट्रवादी नगरसेवकांसमोरही संकट 
राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांचीही अडचण झाली आहे. महापौर सरिता मोरे या राष्ट्रवादीच्या आहेत. त्यांना महापौर करण्यात आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांचा वाटा असल्याने त्या महाडिक यांच्या प्रचारात उतरू शकत नाहीत. पक्षनेते शरद पवार यांनी आदेश दिल्यानंतर नगरसेवक अथवा महापौर महाडिक व्यासपीठावर दिसतील; पण मनाने सोबत राहतील का, असा प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com