Loksabha 2019 : कोल्हापूर मतदारसंघात कामाची शिदोरी विरुद्ध नाराजी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मार्च 2019

पाच वर्षांत संसदेतील उपस्थिती आणि विचारलेले अनेक प्रश्‍न या शिदोरीवर राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना विजयापर्यंत जाता येईल का? याउलट त्यांनी पक्षविरोधी घेतलेली भूमिका, त्यातून नाराज झालेले कार्यकर्ते ही या निवडणुकीतील त्यांचे विरोधी उमेदवार शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणता येईल. 

खासदार महाडिक यांच्या जमेच्या बाजू

 •  संसदेतील चांगली उपस्थिती, प्रश्‍न प्रभावीपणे मांडून सोडवले  
 •  जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्या-त्या विभागाकडे पाठपुरावा
 •  युवाशक्ती, भागीरथी संस्था व महाडिक ग्रुप म्हणून निर्माण केलेली ‘व्होट बॅंक’
 •  ‘गोकुळ’च्या राजकारणातील सक्रिय सहभागाचा फायदा
 •  जिल्ह्यातील प्रत्येक गावात कमी-अधिक प्रमाणात असलेली ताकद

खासदार महाडिक यांची कमकुवत बाजू

 •  पक्षापासून लांब, पक्षविरोधी भूमिकेमुळे अंतर्गत नाराजी
 •  काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हेच विरोधात
 •  सोयीच्या राजकारणामुळे काही प्रमाणात नाराजी 

प्रा. संजय मंडलिक यांच्या जमेच्या बाजू

 •  गोकुळ, जिल्हा परिषदेत काम केल्याचा अनुभव
 •  साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारात काम
 •  शिवसेनेशी पाच वर्षे एकनिष्ठ
 •  अन्य पक्षांकडून प्रलोभने, तरीही परिपक्वतेचे दर्शन
 •  वडील (कै.) सदाशिवराव मंडलिक यांची पुण्याई
 •  आमदार सतेज पाटील गटाची मदत 

प्रा. संजय मंडलिक यांच्या कमकुवत बाजू

 •  कार्यकर्त्यांशी सहजासहजी संपर्क नाही
 •  गरज असताना उपलब्ध होत नाहीत
 •  मतदारसंघात शिवसेना एकसंध नाही

मतदारसंघातील आमदार

 •  करवीर- चंद्रदीप नरके (शिवसेना)
 •  कोल्हापूर उत्तर- राजेश क्षीरसागर (शिवसेना)
 •  कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक (भाजप)
 •  राधानगरी- प्रकाश आबिटकर (शिवसेना)
 •  कागल- हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
 •  चंदगड- संध्यादेवी कुपेकर (राष्ट्रवादी)

राजकीय समीकरणे निघणार ढवळून

लोकसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर झाली असली तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा नारळ याआधीच फुटला आहे. संभाव्य उमेदवार राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक अशी ही सलग दुसऱ्या निवडणुकीची लढत होणार आहे. निवडणुकीचा निकाल काय लागेल हा पुढचा भाग आहे; पण ही निवडणूक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून टाकणारी ठरणार, हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यावरील वर्चस्वाचा कसच यानिमित्ताने लागणार आहे. 

महाडिक विरुद्ध मंडलिक अशी मतपत्रिकेवरील लढत असली तरी महाडिक विरुद्ध काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, असेच या लढतीचे दुसरे अंग असणार आहे. कोल्हापूरची निवडणूक नेहमीच ईर्षेची व चर्चेची ठरली आहे. विद्यमान खासदार महाडिक यांच्या राष्ट्रवादीतील अस्तित्वाच्या मुद्द्यावरूनच वर्षभरापासून या निवडणुकीला वेगळा रंग चढत गेला. महाडिक जरूर राष्ट्रवादीचे खासदार; पण ते भाजपच्या व भाजप त्यांच्या एवढ्या प्रेमात का, हा मुद्दा कळीचा ठरला. हा मुद्दा उपस्थित होण्यास महाडिक यांचा ‘सर्वांना सोबत’ घेऊन जाण्याचा स्वभाव कारणीभूत ठरला.

मात्र, या परिस्थितीत खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच महाडिक हेच पक्षाचे उमेदवार असल्याचे कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष ठसवत ठेवले. त्यामुळे हळूहळू महाडिक यांनाही नावाभोवती राष्ट्रवादीचे बॅनर ठळक करावे लागले. त्यांच्या उमेदवारीबद्दल राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पक्ष प्रमुखांसमोर प्रतिकूल मत व्यक्त केले. मात्र, शरद पवार यांच्या स्पष्ट सूचनेनंतर मुश्रीफ यांनी महाडिक यांच्या पाठीशी राहायला सुरू केले. 

महाडिक यांनी स्वयंत्रणा प्रभावीपणे राबवत प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केला आहे. ते व त्यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांनी पायाला भिंगरी लावली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक आहेत. शिवसेनेच्या त्यांच्या अस्तित्वाबद्दलही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत सुरवातीला फारसे उत्साहाचे वातावरण नव्हते; पण आता त्यांनीही भेटीगाठींचा धडाका लावत आपल्या प्रचाराला गती घेतली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पाठीशी राहण्याचे अभिवचन दिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी युती असली तरी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील शिवसेनेचे प्रा. मंडलिक यांच्याच पाठीशी राहणार, हे स्पष्टच झाले आहे.

Web Title: Kolhapur Lok Sabha Constituency Special