Loksabha 2019 : मातब्बर नेतेच गृहकलहाच्या विळख्यात!

Loksabha 2019 : मातब्बर नेतेच गृहकलहाच्या विळख्यात!

शालीन राजकारण व सक्षम नेतृत्वासाठी जिल्ह्यातील काही घराणी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही घराण्यांचा लौकिक आजही राज्याच्या व देशाच्या राजकारणात आहे. राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांमध्ये जिल्ह्यातील काही घराण्यांचा आदरयुक्त दबदबा राज्यभर आहे. केवळ राजकारण न करता विविध संस्थांच्या माध्यमातून विकास साधण्यात या घराण्यांतील नेत्यांचा हातखंडा आहे. तथापि, अलीकडच्या काळात या घराण्यांना गृहकलहाची लागण झाली आहे. ही लागण या नेत्यांनी वेळीच योग्य रीतीने हाताळली नाही. काहींना लागण झाल्याची कुणकूणही त्यांच्या कुटुंबातील तथाकथित महत्त्वाकांक्षी स्त्री-पुरुषांनी लागू दिली नाही. काही जणांना केवळ पत्नीप्रेम, पुत्रप्रेम, बंधुप्रेम, पुतण्याप्रेम, जावईप्रेम, भाचाप्रेम अशा गोंडस नात्यामुळे माहिती होऊनही लागण थांबविता आली नाही. 

मोजकीच कुटुंबे  कलहापासून दूर 
परिणामी त्याचे रूपांतर खऱ्या खुऱ्या कौटुंबिक कलहात झाले. त्यामुळेच तालुका व जिल्ह्याचे राजकारण करणाऱ्या, आपल्या ‘गडावर’ कित्येक वर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या या नेत्यांना आता जोमात वाढत चाललेल्या कौटुंबिक कलहातून सुटका करून घेणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळेच त्यांच्या जवळचे नेते-कार्यकर्त्यांसह विरोधकही आता ‘पहिले तुमचे घर बघा, मग आमचं आणि राजकारणाचं बोला’, अशी जाहीर टिप्पणी करू लागले आहेत. जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेली हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच कुटुंबे गृहकलहाच्या विळख्यापासून दूर ठेवण्यात त्या-त्या पिढीतील नेते यशस्वी ठरल्याचे दिसते. 

सत्ताकारण हेच मूळ कारण 
सत्ताकारण हेच या कौटुंबिक कलहाचे मूळ आहे. या ‘नामवंत’ कुटुंबांतील थोरली व्यक्ती राजकारणात असते. पुढे तीच साखर कारखाना, शिक्षण संस्था व इतर संस्थांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत राहते. याच व्यक्तीभोवती त्या तालुक्‍यात वलय निर्माण होते. पुढे दुसरा भाऊही मोठ्याच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात येतो. त्यालाही काही मंडळी ‘तू कुठे कमी आहेस?’ अशी चिथावणी देऊन ‘लढ’ म्हणतात. तोही पुढे येण्याचा प्रयत्न करतो. 

अशा वेळी त्या कुटुंबाला मानणाऱ्यांचे दोन गट पडतात. पहिल्यांदा हे गट गावपातळीवर राहतात. हळूहळू तालुका, जिल्हा व राज्य पातळीपर्यंतही त्याचे लोण पोचते. दरम्यानच्या आरक्षणामुळे म्हणा किंवा अन्य कारणास्तव पहिल्या कर्त्या व्यक्तीची पत्नी व मुलगाही राजकारणात येतो. पुढे आपोआपच त्यांचे बंधू व इतर लोकांवरचे प्रेम कमी होऊन पत्नी व पुत्रप्रेम त्यांना ‘सर्व काही’ करण्यास भाग पाडते. 

अपरिपक्व ‘उच्चविद्याविभूषित’
नगर जिल्ह्यातील अनेक मातब्बर कुटुंबांमध्ये नेत्यांना घरातील मंडळींनी ‘सर्व काही’ करण्यास भाग पाडले आहे. काही ठिकाणी तर तिसरी व चौथी पिढीही प्रचंड ‘फास्ट’ व ‘इम्मॅच्युअर’ असल्याने त्या कुटुंबाशी संबंधित नेते व्यथित आहेत. त्यातच राजकारण व समाजकारणातल्या महत्त्वाच्या गोष्टी या ज्येष्ठ नेत्यांची उच्चविद्याविभूषित नातवंडे आजोबा व वडिलांऐवजी आईशी अधिक ‘शेअर’ करतात. परिणामी आईकडून नको त्या महत्त्वाच्या व गोपनीय बाबी सार्वजनिक होत आहेत. त्यामुळे आपण आपल्या संस्थानांवर कसे ‘एककलमी’ राज्य केले व आता हे स्वयंघोषित ‘हुशार’ नातू व ‘लोकप्रिय’ सूनबाई त्याची कशी वाट लावत आहेत, याचे प्रदर्शन नेत्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. या नातू, पुत्र, पत्नी व सूनबाईंच्या स्वयंघोषित शहाणपणाची ‘सोशल व पॉलिटिकल रिॲक्‍शन’ उघड्या डोळ्यांनी पाहावी लागत असल्याच्या वेदना ज्येष्ठ नेत्यांना निमूटपणे सहन कराव्या लागत आहेत. मनातल्या मनात आगपाखड करण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच नाही. 

विशेष म्हणजे ही नेतेमंडळी या बाबी कोणाशीही ‘शेअर’ करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची मनातल्या मनातच घुसमट होत राहते. ही घुसमट त्यांच्या राजकीय व सार्वजनिक कारकिर्दीला व गतीला हानिकारक ठरते, हे मात्र नक्की! 

आपले ठेवावे झाकून अन्‌...
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विखे पाटील घराण्यातील वाद चव्हाट्यावर आला. त्या संदर्भात राजकीय नेत्यांनीच मोठा कांगावा केला; परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक राजकीय घराण्यातील कोणतीही लायकी नसलेले युवराज, ‘हुशार’ सूनबाई, ‘कुशल’ संघटक पुतणे व भाचे यांना आतापासूनच आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. दुसऱ्याच्या घरात कसा कलगीतुरा रंगला आहे, याची रसभरीत वर्णने करण्याची प्रथा विविध घराण्यांमध्ये रूढ झाली आहे. परंतु स्वतःच्या घरातील तेच चित्र या मंडळींना दिसत नाही. ‘आपले ठेवावे झाकून अन्‌...’ या म्हणीशी सुसंगत असे वर्तन सहकार व राजकीय क्षेत्रातील मंडळींचे असल्याचे नेहमी जाणवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com