Loksabha 2019 : माढ्याचा तिढा; दोघांपैकी एकाला भाजपची उमेदवारी शक्य

Loksabha 2019 : माढ्याचा तिढा; दोघांपैकी एकाला भाजपची उमेदवारी शक्य

सोलापूर - आपला कार्यकर्ता किती निष्ठावंत आहे हे तपासण्यासाठी आणि विरोधकांची शिकार योग्य टप्प्यात आणण्यासाठी शरद पवार यांच्याकडे अनेक राजकीय खेळ्या आहेत. पवारांनी माढ्यातून माघार का घेतली? या प्रश्‍नावर दोन मतप्रवाह (कौटुंबिक कारण अथवा घाबरले) असले तरीही पवारांच्या या निर्णयामुळे आज माढ्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यापुढे राजकीय पेच निर्माण झाला आहे. देशमुख किंवा मोहिते- पाटील यांना माढ्यातील भाजपची उमेदवारी स्वीकारावी लागणार आहे. 

शरद पवार यांनी माढ्यातून उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावरून सर्वाधिक विरोध झाला तो माळशिरस तालुक्‍यातून. मोहिते-पाटील समर्थकांनी शरद पवार यांच्यावर आगपाखड केली. कार्यकर्ते आगपाखड करत असताना खासदार मोहिते-पाटील मात्र सांगत होते मीच पवारांना माढ्यासाठी विनंती केली. नेता आणि कार्यकर्ता यांच्यातील हा विसंवाद पद्धतशीरपणे बारामतीला पोचला. त्यामुळे पवारांनी माघार घेतल्यानंतर आज मोहिते-पाटलांपुढे राजकीय पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी मागता येईना आणि भाजप घेईना अशीच गत त्यांची झाली आहे. पवारांच्या उमेदवारीवर व्यक्त होण्याची जशी घाई मोहिते-पाटील समर्थकांनी केली तशीच घाई सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याही कार्यकर्त्यांनी केली. "माढा आणि पवारांना पाडा', "लढ बापू लढ, माढ्याचा गड' या घोषणांनी सहकारमंत्री समर्थकांनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला. माढ्यातून भाजपने मोहिते-पाटलांना उमेदवारी दिल्यास आपण काय करणार? याचा सांगावा जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. त्यामुळे माढ्यात सध्या तरी भाजपपुढे सहकारमंत्री देशमुख यांची उमेदवारी आणि मोहिते-पाटलांचे सहकार्य या शिवाय शाश्‍वत पर्याय नाही. माढ्यातून पवार असतील या हिशेबाने सोशल मीडियाच्या माध्यमातून धुमाकूळ घातल्याने सहकारमंत्री देशमुख यांना इच्छा नसतानाही माढ्याची उमेदवारी स्वीकारावी लागणार आहे. ही उमेदवारी स्वीकारल्यानंतर त्यांना सोलापूरनंतर माढ्यातही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या समविचारी गटाशी सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. उमेदवारीचा भाजपचा पत्ता पडल्यानंतरच माढ्यासाठी राष्ट्रवादीचा हुकमी एक्का जाहीर होण्याची दाट शक्‍यता आहे. 

जिल्ह्याचा नेता ठरविणारी निवडणूक 
भाजपकडून सहकारमंत्री देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे आणि करमाळ्याच्या नेत्या रश्‍मी बागल यांच्या नावाची शक्‍यता आहे. साळुंखे व बागल यांच्या तुलनेत संजय शिंदे सरस आहेत. संजय शिंदे यांनी सध्या तरी दिल्लीला जाण्याची इच्छा व्यक्त केली नाही. या निवडणुकीत जो गट बाजी मारेल तो जिल्ह्याचा नेता ठरेल हे निश्‍चित. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीत घडणाऱ्या घडामोडींवर बरच काही अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com