Loksabha 2019 : सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसमध्ये दुफळी

Loksabha 2019 : सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसमध्ये दुफळी

नगर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर शहरातील काँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी झाली आहे. थोरात गटाचे माजी शहर-जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचाराची फळी उभारण्याचा निर्णय काल घोषित केला. दुसरीकडे विखेसमर्थक असलेल्या अन्य नेत्यांनी डॉ. सुजय यांचे जोरदार स्वागत करून त्यांना पाठबळ देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

डॉ. सुजय भाजपमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पक्षाच्या कार्यालयात सकाळी बैठक झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. वामशी चल्लारेड्डी अध्यक्षस्थानी होते. राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान बनवायचे असेल, तर लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागा आघाडीला जिंकाव्याच लागतील. त्यासाठी काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल, ‘एनएसयूआय’चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन चल्लारेड्डी यांनी केले. 

काँग्रेसचे माजी शहर-जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी, प्रदेश सरचिटणीस निजाम जहागीरदार, ब्लॉक कमिटी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, ‘युवक’चे राष्ट्रीय सचिव हेमंत ओगले, रिजवान शेख, अन्वर सय्यद आदींनी या वेळी मनोगत व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, उबेद शेख, फिरोज खान, आर. आर. पिल्ले, सुरेश झावरे, रियाज सय्यद, श्‍याम वाघस्कर आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच नगरला आलेले डॉ. सुजय यांचे काँग्रेसचे माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे व धनंजय जाधव यांनी स्वागत केले. या तिन्ही नेत्यांच्या पत्नी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. याशिवाय बसपचे नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती मुद्दस्सर शेख, सचिन जाधव, शिवसेनेचे नगरसेवक सुभाष लोंढे हेदेखील या वेळी उपस्थित होते.

शिवसेनेकडून स्वागत; भाजप गैरहजर
डॉ. सुजय विखे पाटील यांचे आज नगरमध्ये शिवसेनेतर्फे स्वागत करण्यात आले. उपनेते अनिल राठोड यांच्या निवासस्थानी राठोड यांच्या पत्नी शशिकला यांनी डॉ. विखे पाटील यांचे औक्षण केले. माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश कवडे, योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, विक्रम राठोड, सचिन शिंदे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, डॉ. विखे पाटील यांनी आज खासदार दिलीप गांधी व पक्षाच्या कार्यालयास भेट देण्याचे नियोजन केले होते. तथापि, त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड नगरमध्ये नसल्याची व खासदार गांधी यांनी भेट टाळल्याची चर्चा होती. पक्षाचे गांधी मैदान येथील कार्यालय आज बंद होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com