Election Results : कोल्हापुरात संजय मंडलिक एक लाख चार हजार मतांनी आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 May 2019

कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना तब्बल 1 लाख 4 हजार 992  मतांची आघाडी मिळाली आहे. सहाव्या फेरीपर्यंत कल पहाता मंडलिक यांची विजयाची घोडदौड कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना तब्बल 1 लाख 4 हजार 992  मतांची आघाडी मिळाली आहे. सहाव्या फेरीपर्यंत कल पहाता मंडलिक यांची विजयाची घोडदौड कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीपासून सहाव्या फेरीपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संजय मंडलिक आघाडीवर आहेत. काही मतदारसंघात धनंजय महाडिक यांच्यापेक्षा दुप्पट मते संजय मंडलिक यांनी घेतली आहेत. 

सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीनंतर दोनच तासात म्हणजे दहा वाजेपर्यंत चार फेऱ्यांची मतमोजणी झाली होती. यामध्येही संजय मंडलिक यांनी आघाडी कायम ठेवली. यानंतर चहा, नाष्टासाठी ब्रेक घेण्यात आला होता. पुन्हा सुरू झालेल्या मतमोजणीत पुढील दोन फेऱ्यांमध्ये सुद्धा संजय मंडलिक यांनी त्यांची आघाडी कायम ठेवली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असाच फरक राहिला तर संजय मंडलिक यांचा विजय निश्चित आहे. 

2014 च्या निवडणुकीमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी 33 हजार मतांनी मंडलिक यांचा पराभव केला होता. त्याचे उट्टे आता संजय मंडलिक हे काढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. खासदार महाडिक यांचे ज्येष्ठ चिरंजीव पृथ्वीराज महाडिक हे मतमोजणी ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासूनच बसून होते. पण कल लक्षात येताच ते येथून बाहेर गेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या ईर्षेने फेरिनिहाय आकडेमोड करीत होते. साधारण सहाव्या फेरीच्या निकालानंतर महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळल्याचे दिसून आले. तरीही जोपर्यंत बारा ते पंधरा फेऱ्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत निकालाचा स्पष्ट कल सांगता येणार नसल्याचे कार्यकर्ते सांगत होते.

दरम्यान निवडणूक प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे. कागल विधानसभा मतदारसंघ वगळता इतर विधानसभा मतदारसंघात वेगाने आणि शिस्तीने मोजणी सुरू आहे. मतमोजणी प्रक्रिया योग्य पद्धतीने चालण्यासाठी सर्व कर्मचारी आणि अधिकारी विशेष काळजी घेत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Election Result Kolhapur constituency